Sharad Pawar : ‘तुमच्या हातात सत्ता असून तुम्हाला दिल्ली सांभाळता येत नाही’ शरद पवारांनी अमित शहांना सुनावलं
Amit Shah Sharad Pawar : दिल्लीत एखादी घटना घडली तरी त्याचा संदेश जगामध्ये जातो आणि या देशात अस्थिरता आहे, अशाप्रकारची भावना निर्माण होते, असंही ते म्हणाले.
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर निशाणा साधलय. तुमच्या हातात सत्ता असून तुम्हाला दिल्ली सांभाळता येत नाही, असं म्हणत शरद पवारांनी अमित शहांवर निशाणा साधलाय. ते कोल्हापुरात बोलत होते. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शरद पवारांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वासह केंद्र सरकारवरही हल्लाबोल केला. तर महाराष्ट्रातील भाजप (BJP Maharashtra) नेत्यांनाही खडेबोल सुनावलेत. दिल्लीत झालेल्या हिंसाचारावरुन शरद पवारांनी जोरदार टीका केली. दिल्लीत आम आदमी पक्षाचं सरकार आहे. मात्र दिल्लीच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्राचीच आहे, याची आठवण शरद पवारांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाला यावेळी करुन दिली. फेसबुकवर पोस्ट करत शरद पवारांनी आपल्या संपूर्ण भाषणात व्यक्त केलेल्या मुद्द्यांना शेअर केलं आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाल्यानंतर शरद पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधलाय.
दिल्लीचतील दंगलीला भाजप जबाबदार?
शरद पवार यांनी कोल्हापुरातील सभेत म्हटलंय, की…
मागच्या काही दिवसात आपण पाहिले तर दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात हल्ले झाले, जाळपोळ झाली. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल असले तरी दिल्लीचे गृहखाते त्यांच्या हातात नाही. दिल्लीची कायदा व सुव्यवस्था केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हातात आहे. अशावेळी तेथील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांची होती, पण त्यांनी ही काळजी घेतली नाही. दिल्लीत एखादी घटना घडली तरी त्याचा संदेश जगामध्ये जातो आणि या देशात अस्थिरता आहे, अशाप्रकारची भावना निर्माण होते. तुमच्या हातात सत्ता असून तुम्हाला दिल्ली सांभाळता येत नाही.
जिथं जिथं भाजप, तिथं आव्हानात्मक स्थिती
हुबळीतील दंगलींवरुनही शरद पवारांनी सभेत भाजपला आरसा दाखवला. त्यांनी म्हटलंय, की ‘दोन दिवसांपूर्वी मी कर्नाटकात होतो. त्यावेळी तेथील कार्यकर्त्यांनी सांगितले की, हुबळीसारख्या ठिकाणी जातीय दंगली झाल्या. आज कर्नाटकमध्ये अल्पसंख्याक समाजाविरोधात जाहीर फलक लावले गेले आहेत.’
‘अमुक एका गावात अल्पसंख्याकांच्या दुकानात कुणी जाऊ नये, त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊ नये, असे जाहीर फलक लावले जात आहेत. हा संदेश देणारे लोक सत्ताधारी भाजपचे आहेत. जिथे जिथे भाजपच्या हातात सत्ता आहे, तिथे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एक प्रकारची आव्हानात्मक परिस्थिती आपल्यासमोर आहे.’, असंही ते म्हणालेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोल्हापूर येथील तपोवन मैदानात संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारी पार पडलेल्या या संकल्प सभेत बोलताना शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.