BREAKING | अमित शाह ‘त्या’ प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस यांना थेट कारवाईचे निर्देश देणार? दिल्लीत मोठ्या घडामोडी
महाराष्ट्रातील एका घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज मोठ्या घडामोडी घडल्या. दिल्लीत संबंधित घटनेची तक्रार थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करण्यात आलीय. अमित शाह यांनी तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे ते स्वत: या प्रकरणात काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आल्यामुळे ठाण्यातलं राजकारण प्रचंड तापलं आहे. रोशनी शिंदे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रोशनी शिंदे यांच्यासोबत जे घडलं त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने बुधवारी (5 एप्रिल) ठाण्यात मोर्चा काढला होता. या मोर्च्यात शेकडो कार्यकर्ते दाखल झाले होते. या मोर्चादरम्यान घोषणाबाजी करणाऱ्या युवासेनेच्या सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुन्न झाले आहेत. ठाण्यातल्या घटनेनंतर हे सगळं घडलं आहे. ठाण्यातल्या घटनेवरुन दिल्लीतही मोठ्या घडामोडी घडल्याची माहिती मिळत आहे.
ठाण्यात रोशनी शिंदे यांना मारहाण प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. पण या मारहाण प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. याउलट सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी रोशनी शिंदे यांच्याविरोधात दोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात घडलेल्या या घटनेप्रकरणी देशाची राजधानी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडल्या. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करण्याची विनंती केली.
भावना गवळी यांची ठाकरे गटावर टीका
विशेष म्हणजे प्रियंका चतुर्वेदी यांच्यानंतर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनीदेखील अमित शाह यांची भेट घेतली. भावना यांनी या प्रकरणावरुन ठाकरे गटावर निशाणा साधला. ठाकरे गटाकडून या प्रकरणावरुन राजकारण केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय इतरवेळी अन्याय झाला तेव्हा ठाकरे गट कुठे होते? उद्धव ठाकरे यांना ठाण्यात येण्याचा अधिकार नाही, अशी टीका भावना गवळी यांनी केली. राजकीय फायद्यासाठी ठाकरे गटाकडून कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप भावना गवळी यांनी केला.
अमित शाह कारवाईचे निर्देश देणार
या सगळ्या घडामोडींनंतर आता महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गृहमंत्री अमित शाह ठाण्याच्या घटनेवरुन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणार आहेत. त्यांनी या राड्याची दखल घेतली आहे. या प्रकरणात कोणातही भेदभाव न करता कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्या भेटीदरम्यान दिली. त्यामुळे अमित शाह या प्रकरणाची माहिती घेणार आहेत. तसेच या प्रकरणी अमित शाह कारवाईचे निर्देश देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली आहे.