अमित ठाकरे चहा घेत नाहीत, परंतु दिबांच्या घरून चहा घेतल्याशिवाय कोणी जात नाही! मनसेकडून दि. बा. पाटलांच्या कुटुंबीयांचा सन्मान
अमित ठाकरे यांनी 11 जुलै रोजी लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या पनवेल येथील निवासस्थानी जाऊन त्यांना अभिवादन केले. दिबांचे सुपुत्र अतुल पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवतीने अमित ठाकरे यांचे स्वागत केले.
नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सद्या रायगडच्या दौऱ्यावर आहेत. मनसेचे महासंपर्क अभियान सुरु आहे. अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी 11 जुलै रोजी लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या पनवेल येथील निवासस्थानी जाऊन त्यांना अभिवादन केले. दिबांचे सुपुत्र अतुल पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवतीने अमित ठाकरे यांचे स्वागत केले. दिबांच्या कार्याची महती उभयतांनी अमित ठाकरे यांना सांगितली. या भेटीदरम्यान अमित ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळासाठी (Navi Mumbai Airport) दिबांच्या नावाचा पुरस्कार केला. त्याच बरोबर अतुल पाटील यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या भेटी दरम्यान अतुल पाटील यांनी आपल्या मातोश्री उर्मिलाताई पाटील यांनी लिहिलेले पुस्तक अमित ठाकरेंना भेट दिले. छोटेखानी झालेल्या या सभारंभात अमित ठाकरे यांना चहा घेण्याचा आग्रह केला. अमित ठाकरे यांनी आपण चहा घेत नसल्याचे यावेळी सांगितले. मात्र पाटील साहेबांच्या घरातून चहा घेतल्याशिवाय कोणीही परत जात नाही, अशी आवर्जून विनंती केल्यानंतर अमित ठाकरे यांनी दिबांच्या घरी चहाचा आस्वाद घेतला.
उद्धव ठाकरेंनी घेतला होता निर्णय
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळण्यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र, सत्तांतरानंतर ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयांवर फेरविचार करण्याची भूमिका एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं घेतलीय.
कोण होते दि. बा. पाटील?
दि. बा. पाटील अर्थात दिनकर बाळू पाटील यांचा जन्म रायगडच्या उरण तालुक्यातील जसई गावात झाला. दि. बा. पाटील एका शेतकरी कुटुंबात जन्माला आले. त्यांनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. पनवेलचे नगराध्यक्ष, चार वेळा आमदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास. शेतकरी कामगार पक्षातून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. नवी मुंबईतील अनेक विकासकामांत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
अनेक नावांची सुरु होती चर्चा
दि. बा. पाटील यांच्या व्यतिरिक्त राज्य सरकारनं बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. बंजारा समाजानं या विमानतळाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं नाव द्यावं, अशी मागणी केली होती. सिडकोची संकल्पना ही माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची होती. त्यामुळं त्यांचं नाव विमानतळाला द्यावं, अशी मागणी पोहरादेवची मनंत सुनील महाराज यांनी केली होती. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवी मुंबईचं विमानतळ स्वतंत्र नाही. त्यामुळं जे नाव मुंबई विमानतळाला तेच नाव नवी मुंबई विमानतळाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं देण्यात यावं, असं म्हटलं होतं. नाव कोणतं द्यायचं यावरून वरीच चर्चा सुरु होती. प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी दि. बा. पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावं, यासाठी आंदोलनं केली होती.