स्वातंत्र्यानंतर संस्थानं खालसा, आता कोणी राजे नाहीत, अमोल कोल्हेंची उदयनराजेंवर तोफ
स्वातंत्र्यानंतर सर्व संस्थानं खालसा झाली आहेत. आता कोणीही राजे नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपवासी झालेले साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
नवी मुंबई : जुलमी सत्तेच्या विरोधात केलं जातं ते बंड असतं, पण सत्तेच्या गोटात जाण्यासाठी होते ती फक्त फितुरी असते, अशा शब्दात राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर (Amol Kolhe on Udayanraje) निशाणा साधला. स्वातंत्र्यानंतर सर्व संस्थानं खालसा झाली असून आता कोणीही राजे नाही, असं म्हणत कोल्हेंनी उदयनराजेंचा (Amol Kolhe on Udayanraje) समाचार घेतला.
एकदा गणेशोत्सव संपला की विसर्जनानंतर त्यावर बोलायची गरज नाही, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी भाजपच्या वाटेवर असलेले नवी मुंबईतील ज्येष्ठ नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांनाही टोला लगावला. नवी मुंबईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते.
‘जनतेच्या विकासासाठी पक्षांतर करत आहे’ असं जेव्हा एखादा नेता म्हणतो, तेव्हा जनता ‘स्वतःची कातडी बचावण्यासाठी’ असं वाचते, कारण जनता आता दुधखुळी राहिलेली नाही. ज्या सरकारच्या पाच वर्षांच्या काळात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्या सरकारमध्ये जाऊन कोणता विकास साधायचा आहे? असा सवाल अमोल कोल्हेंनी विचारला.
पाच वर्षांत महाराष्ट्रावरचं कर्ज दुपटीने वाढवलं, ते विकासाच्या गोष्टी करत आहेत. ज्या मुख्यमंत्र्यांकडे गृह मंत्रालय आहे, त्यांच्या नागपूर जिल्ह्याची क्राईम कॅपिटल अशी ओळख असल्याचंही अमोल कोल्हे म्हणाले.
हे सरकार फक्त जाहिरातबाजीचं आहे. न केलेल्या कामगिरीवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत, असा आरोपही अमोल कोल्हे यांनी भाषणात केला. जाहिराती बघून तेल नाहीतर साबण निवडायचं असतं, सरकार नाही, असा टोमणाही कोल्हेंनी मारला.
अमित शाहांचे आभार कारण त्यांनी सोलापुरात येऊन मराठी माणसाच्या स्वाभिमानालाच डिवचलं आहे. महाराष्ट्रात येऊन, शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? हे विचारायची हिंमत त्यांनी केली, असं अमोल कोल्हे म्हणाले.
लोकसभेची निवडणूक झाली. ती आता बाजूला ठेवा. ही निवडणूक विधानसभेची आहे. शहीदांच्या नावावर मत मागणारे आता पाकिस्तानातून कांदा आयात करत आहेत, अशी टीकाही अमोल कोल्हेंनी केली.
गड किल्ले विकायला काढण्याचा निर्णय घेतल्यावर पर्यटन मंत्र्यांनी मलाच ‘तुम्हाला कोणाच्या लग्नाला जायचं आहे’ असा प्रश्न विचारल्याचं कोल्हेंनी सांगितलं. या सरकारने महाराष्ट्राचा स्वाभिमान विकायला काढण्याचं काम केल्याचा घणाघातही अमोल कोल्हे यांनी केला.