राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडे औरंगाबादेतील एकमेव आमदाराची पाठ
औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे मोठ्या नेत्यांपैकी फक्त अजित पवारच व्यासपीठावर होते. अमोल कोल्हेंच्या (MP Amol Kolhe) नेतृत्त्वात यात्रा असूनही त्यांची अनुपस्थिती असल्याने कार्यकर्त्यांचाही हिरमोड झाला. पण अजित पवार यांचं भाषण सुरु असताना अमोल कोल्हेंचं आगमन झालं.
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेने औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश केलाय. पण जिल्ह्यातील पहिल्याच कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी उशिरा हजेरी लावली. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे मोठ्या नेत्यांपैकी फक्त अजित पवारच व्यासपीठावर होते. अमोल कोल्हेंच्या (MP Amol Kolhe) नेतृत्त्वात यात्रा असूनही त्यांची अनुपस्थिती असल्याने कार्यकर्त्यांचाही हिरमोड झाला. पण अजित पवार यांचं भाषण सुरु असताना अमोल कोल्हेंचं आगमन झालं.
शिवस्वराज्य यात्रा ज्या जिल्ह्यात जाईल, तेथील स्थानिक आमदार, खासदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होतील, असं राष्ट्रवादीकडून पत्रकातच सांगण्यात आलंय. पण औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आमदारानेही यात्रेकडे पाठ फिरवली. भाऊसाहेब चिकटगावकर पक्ष सोडणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. त्यामुळे तर त्यांनी पाठ फिरवली नाही ना, असाही प्रश्न आता निर्माण होतोय.
शिवनेरी किल्ल्याहून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा 6 ऑगस्टला सुरु करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील ही यात्रा 10 तारखेला सिंदखेडराजा इथे पोहोचणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील यात्रेची सुरुवात 16 ऑगस्टला तुळजापूरमधून सुरु होईल, तर 19 ऑगस्टला चोंडी येथे अहिल्यादेवी स्मारकाला अभिवादन करुन यात्रा पुढे रवाना होईल. दुसऱ्या टप्प्यातील यात्रेचा समारोप 28 ऑगस्टला रायगडावर होईल.
या यात्रेत अमोल कोल्हे यांच्यासह युवक संघटनेतील किमान 10 कार्यकर्ते सतत राहतील, असंही राष्ट्रवादीने म्हटलं होतं. पण औरंगाबाद जिल्ह्यातील पहिल्याच यात्रेत अमोल कोल्हेंनी उशिरा उपस्थिती लावली. पण नंतर अजित पवारांचं भाषण सुरु असताना त्यांचं आगमन झालं.
अजित पवारांनी या कार्यक्रमात बोलताना राज्य सरकारवर सडकून टीका केली. राज्यात एकीकडे भीषण दुष्काळ आहे, तर दुसरीकडे महापूर आहे. राज्य सरकारचं कोणतंही नियोजन नाही. किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा पवार साहेब पहाटेच घटनास्थळी दाखल झाले होते. हे मुख्यमंत्री मंत्रालयातून आढावा घेतात. पूरस्थितीत आम्ही बोटीतून फिरायचो. या पालकमंत्र्यांनी सगळीकडे दौरे काढले पाहिजेत, असं म्हणत अजित पवारांनी जोरदार हल्लाबोल केला.
या सरकारच्या काळात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सगळीकडे जागा रिकम्या आहेत, पण मेगाभरतीचं काय झालं त्याबद्दल सरकार काहीही बोलत नाही. मराठा आरक्षण आंदोलनात दाखल झालेले खटले मागे घेण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, पण हे खटले अजून मागे घेतलेले नाहीत, असंही अजित पवार म्हणाले.
पक्ष सोडणाऱ्या नेत्यांचाही अजित पवारांनी समाचार घेतला. हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं सरकार नाही, त्यामुळे आम्ही शिवस्वराज्य सरकार आणण्यासाठी इथे आलो आहोत. काही लोक उड्या मारतात, निष्ठेला काही महत्व राहिलेलं नाही, कुणाच्या काय चौकशा सुरू आहेत. कुणाला काय मदत हवी आहे. पण माझी मतदार राजाला विनंती आहे, की दलबदलू लोकांना जागा दाखवली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.