शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले खासदार अमोल कोल्हे ‘महाशिवआघाडी’वर म्हणतात…
महाशिवआघाडी सरकार कधी, कशा पद्धतीने स्थापन होणार, नक्की कोणाचं सरकार येणार, याची उत्तरं शरद पवार देतील, असं अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलं.
पुणे : महाशिवआघाडीची आधी अधिकृत घोषणा होऊ दे, मग त्यावर चर्चा करु, असं शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) म्हणाले. कोल्हेंनी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला होता. मात्र सध्या सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन पक्षच काँग्रेसच्या साथीने ‘महाशिवआघाडी’ करण्याच्या तयारीत (Amol Kolhe on Mahashivaaghadi) आहेत.
सरकार लवकरात लवकर स्थापन व्हावं असं मला वाटतं. 18 तारखेपासून अधिवेशन आहे, त्यात मी काय बोलणार, हे सांगण्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. महाशिवआघाडी सरकार कधी, कशा पद्धतीने स्थापन होणार, नक्की कोणाचं सरकार येणार, याची उत्तरं शरद पवार देतील. पक्षातील सर्वाधिकार त्यांना आहेत, असं अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलं.
अमोल कोल्हे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन जुन्नर तालुक्यातील नारायणगावमध्ये विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झालं. लोकसभा निवडणुकीनंतर शिरुरचे खासदार मतदारसंघात नसतात असा आरोप विरोधक करत होते, त्यावर अमोल कोल्हे यांनी उत्तर दिलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात विरोधकांनी खोटा प्रचार केला. मात्र शिरुरमधील मतदारांनीच त्यांचा आक्षेप खोडून काढला. सुरुवातीला मी शिवस्वराज्य यात्रेत व्यस्त होतो. शरद पवारांनी माझ्यावरराज्याची जबाबदारी दिली होती आणि मी या मतदारसंघातील 6 पैकी 5 आमदार निवडून दिले, असं कोल्हे म्हणाले.
मुख्यमंत्रिपदाची मागणी असेल, तर विचार करु : शरद पवार
आता दर गुरुवार-शुक्रवार मी वेळ देणार आहे. हडपसरनंतर नारायणगावात संपर्क कार्यालय सुरु केलं आहे. गरज पडल्यास भोसरीतही कार्यालय सुरु आहे. इथले प्रश्न संसदेत मांडले जात असतील आणि कामं अडत नसतील, तर विरोधकांचा आरोप अनाठायी आहे, असंही कोल्हे (Amol Kolhe on Mahashivaaghadi) म्हणाले.
काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा अद्याप सुरु आहे. वाटाघाटी प्राथमिक टप्प्यात आहेत. मुख्यमंत्रिपदाची मागणी कोणाची असेल, तर त्याचा विचार नक्की करावा लागेल, असं उत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं. नागपुरात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पवार गेले होते, त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.