वाघ दरवाजातून 144 जागा मागतोय, भाजप फेकलेला तुकडा घ्या म्हणतोय : अमोल कोल्हे
वाघ दरवाजातून 144 जागांची मागणी करतोय, तर भाजप सांगतोय फेकलेला तुकडा घ्या, अशा शब्दात डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
रत्नागिरी : युतीच्या पोपटाची अवस्था फार वाईट आहे. वाघसुद्धा दरवाजातून 144 जागांची मागणी करतोय, तर भाजप सांगतोय आम्ही फेकलाय तेवढा तुकडा घ्या, अशा शब्दात राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेवर निशाणा (Amol Kolhe on Shivsena) साधला. रत्नागिरीतील गुहागरमध्ये शिवस्वराज्य यात्रेदरम्यान डॉ. कोल्हेंची तोफ पुन्हा एकदा धडाडली.
स्वार्थासाठी सत्तेच्या वळचणीला जाणाऱ्यांचा इतिहास नसतो, तर लढणाऱ्यांचा असतो, असं म्हणत अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe on Shivsena) राष्ट्रवादीला रामराम ठोकून सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या गोटात शिरणाऱ्या गयारामांचा समाचार घेतला. पवार साहेबांना फसवल्याची चीड गुहागरवासियांच्या चेहऱ्यावर पाहून आनंद झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर लोकं उभे होते, असं कोल्हे म्हणाले.
छत्रपती शिवाजींचा भगवा आता राष्ट्रवादीच्या हातात आला आहे. कुणाच्या जाण्याने पोकळी निर्माण होणार नाही. कारण झाडाला सुद्धा पालवी फुटते, असा विश्वास कोल्हेंनी व्यक्त केला.
जेव्हा चांगलं घडतं, तेव्हा युतीचं सरकार आणि काही वाईट झालं तर ते भाजप सरकार असल्याचं शिवसेना म्हणते, असं म्हणत अमोल कोल्हेंनी शिवसेना दुटप्पी भूमिका घेत असल्याचा दावा केला.
‘राज्यात येत्या काळात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती निर्माण करणार असं शिवसेना सांगते मात्र गेली पाच वर्षं उद्योग खातं शिवसेनेकडे होतं, तेव्हा काय केलं? यावर कोणीही बोलायला तयार नाही. माझ्या मंत्र्यांनी गेल्या 5 वर्षात काही काम केलं नाही हे अप्रत्यक्षपणे सांगत असावेत.’ असंही अमोल कोल्हे म्हणाले.
गुहागरमधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदारपदी निवडून आलेले माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि पंधरा वर्षांनी शिवसेनेत घरवापसी केली आहे. ‘पक्ष सोडून गेलेल्यांबद्दल बोलण्यात अर्थ नाही. ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा निर्णय त्यांनी घेतला.’ असं अमोल कोल्हे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना सांगितलं.
शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर गेल्या पाच वर्षांत शिवसेना-भाजप युतीचं सरकार अपयशी ठरलं आहे. पवार साहेब महाराष्ट्राची विचारधारा आहेत. शरद पवारांची लाट महाराष्ट्रभरात आहे, असंही अमोल कोल्हे म्हणाले.
संबंधित बातम्या :
मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही, अमोल कोल्हेंची शिष्टाईनंतर प्रतिक्रिया
पन्हाळ्यावरील रोमँटिक गाण्यावरुन ट्रोल, खासदार अमोल कोल्हेंचं उत्तर
…तेव्हा 40 पैशाचे लावारिस भक्त लगेच मेसेज करतात : अमोल कोल्हे
स्वातंत्र्यानंतर संस्थानं खालसा, आता कोणी राजे नाहीत, अमोल कोल्हेंची उदयनराजेंवर तोफ