Amol Mitkari : मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने राज्यपालांनी माफी मागितली, मिटकरींचा भाजपाला टोला
राज्यपालांनी माफी मागितली कारण त्यांच्यावर केंद्राकडून दबाव होता. आता निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे त्यांना माफी मागावी लागली असे अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी म्हटले आहे.
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी एका राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात बोलताना मुंबई आणि महाराष्ट्राबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. अखेर आता या प्रकरणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागितली आहे. राज्यपालांनी माफी मागितल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) आणि अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्यपालांच्या माफीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भगतसिंग कोश्यारी यांना आता कुठेतरी महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची ओळख झाली आहे. मराठी माणसाचं सागरासारख विशाल हृदय आहे. मात्र राज्यपालांना त्यांच्या वक्तव्याबाबत मराठी माणूस माफ करणार नाही. खर तर आपलीच चूक झाली, जेव्हा ते शिवाजी महाराजांबद्दल बोलले तेव्हाच मराठी माणसाने पेटून उठायला पाहिजे होतं, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं?
देर आये दुरुस्त आहे अशी म्हण आहे. राज्यपालांनी माफी मागितली कारण त्यांच्यावर केंद्राकडून दबाव होता. आता निवडणुका जवळ येत आहेत. त्यामध्ये मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकांचा देखील समावेश आहे. जर माफी मागितली नाही तर त्याचा फटका हा मुंबईत भाजपाला बसू शकतो. या भितीमुळे राज्यपालांनी माफी मागितली. इथला मराठी माणुस मोठ्या मनाने माफ करणारा आहे, मात्र कोश्यारींचे हे वक्तव्य तो कधिही विसरणार नाही. भाजपाला मुंबई मनपामध्ये याचा हिशेब चुकता करावा लागेल. राज्यपालांनी आता उत्तराखंडला जावे असे मिटकरी यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हटलं होतं राज्यपालांनी?
राज्यपालांनी एका राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात बोलताना म्हटलं होतं की, मुंबईतून जर गुजराती आणि राजस्थानी समाज गेला तर मुंबई आणि परिसरात पैसा उरणार नाही. मुंबई आज आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र हा समाज बाहेर पडला तर आर्थिक राजधानी ही मुंबईची ओळख पुसली जाईल. राज्यपालांच्या या वक्त्यव्यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती. अखेर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागितली आहे.