आमदार रवी राणांसह शेतकऱ्यांची कारागृहातून सुटका, सोमवारी हजारो शेतकऱ्यांसह ‘मातोश्री’वर धडक देणार!
रवी राणा यांच्यासह अटकेतील शेतकऱ्यांची कारागृहातून सुटका झाली आहे. मात्र, राज्य सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत असल्याचा आरोप करत रवी राणा यांनी हजारो शेतकऱ्यांसह उद्या 'मातोश्री'वर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
अमरावती: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी रास्तारोको केल्यानंतर आमदार रवी राणा यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. आज अखेर रवी राणा यांनी सत्र न्यायालयातून जामीन मिळवला आहे. त्यामुळे रवी राणा यांच्यासह अटकेतील शेतकऱ्यांची कारागृहातून सुटका झाली आहे. मात्र, राज्य सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत असल्याचा आरोप करत रवी राणा यांनी हजारो शेतकऱ्यांसह उद्या ‘मातोश्री’वर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (Farmers including MLA Ravi Rana released from jail)
अतिवृष्टीमुळं पिकांचं मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या, लॉकडाऊनच्या काळात आलेलं वीज बिल माफ करा या मागणीसाठी आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. मात्र, या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. त्यानंतर रवी राणा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल 2 तास अडवून धरला होता. त्यामुळे दोन्ही बाजूला गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्या. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करत हे आंदोलन मोडून काढत आमदार रवी राणा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती.
रवी राणा आणि शेतकऱ्यांच्या अटकेचा फडणवीसांकडून निषेध
‘शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो’, अशा शब्दात रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीस यांनी काल ट्विटरवरुन निषेध नोंदवला होता.
खासदार नवनीत राणा यांचं कारागृहाबाहेर धरणं
खासदार नवनीत राणा शनिवारी आमदार रवी राणा यांना भेटण्यासाठी कारागृहात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना भेटू देण्यात आलं नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेरच धरणं धरलं. त्यावेळी नवनीत राणा यांची पोलिसांसोबत बाचाबाचीही झाली. जोपर्यंत रवी राणा यांची भेट होणार नाही तोपर्यंत कारागृहाबाहेर धरणे आंदोलन सुरु राहणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. तर दुसरीकडे पोलिसांनी अटक केल्यानंतर आमदार रवी राणा यांनी कारागृहात अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या:
आमदार रवी राणांसह 18 शेतकऱ्यांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल; राणांची रात्र तिवसा पोलीस ठाण्यात
शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, आमदार रवी राणांसह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक
Amravati : Farmers including MLA Ravi Rana released from jail