अमरावती : अजित पवार हे महायुतीत सहभागी झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचं बोललं जात आहे. प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे.
मी मंत्रिपदासाठी थोडी बोलत आहे. एकंदरीत या व्यवस्थेमध्ये कोण कसं अडचणीत येत आहे. ते मी सांगत आहे. शेवटी काही मर्यादा असतात. किती वेळ थांबायचं, किती वेळ सहन करायचं याच्याही काही मर्यादा आहेत. जर मर्यादा तुटल्या तर कोणीच कुणाच नसतं, असं म्हणत बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
मी जे काही करेल ते मीडियाला सांगून करणार नाही. आतमधून सर्व शिजू द्यावं लागतं.व्यवस्थित पाहू आणि मग योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ. मग तुम्हाला माहित पडेल की मी काय करू शकतो, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे.
राष्ट्रवादीवर टीका करत अनेक आमदार शिवसेनेमधून बाहेर पडले होते. आता विचारात न घेता राष्ट्रवादीला सत्तेत घेतलं याचा परिणाम शिंदे गटातील 40 आमदारांवर होणार आहे. त्या चाळीस लोकांनी मतदारांना आता काय उत्तर द्यायचं?, असं म्हणत बच्चू कडू यांनी शिवसेमा आमदार आणि त्यांच्या समर्थकांची होणारी अडचण बोलून दाखवली.
पहिल्याला मारायचा आणि दुसऱ्याला हाती घ्यायचं. दुसऱ्याला मारायचा तिसऱ्याला हाती घ्यायचं. ही जी काही भूमिका आहे हे थांबलं पाहिजे, असं म्हणत बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपसोबत जाऊन चुकी झाल्याचं म्हणून काय फायदा आहे. एकदा चुकलेल्या माणसाला दुरुस्त करता येतं चूक वाटून घेण्यात काही अर्थ नसतो. आता दुरुस्त करावं लागेल जेव्हा वेळ येईल तेव्हा दुरुस्त करू, असं बच्चू कडू म्हणालेत.
काहींना वाटत असेल की आपला पक्ष मोठा होईल पण ते गोत्यात जाणार आहेत, असं म्हणत बच्चू कडू यांनी भाजपला टोला लगावला आहे.
आपला पक्ष वाढत असताना दुसऱ्याचे मरण होऊ नये याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. एवढा मोठा निर्णय घेत असताना आमचा प्रहार पक्ष आहे. आम्हाला सुद्धा विचारात घ्यायला पाहिजे होतं, असं म्हणत बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.