राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना जोडे दाखवण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धरपकड, कुठे घडली घटना?
राज्यपालांना महाराष्ट्रातून हाकलून द्यावे, अशी मागणी महाविकास आघाडीकडून लावून धरण्यात आली आहे.
अमरावतीः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना जोडे दाखवण्याचा प्रयत्न आज अमरावतीत (Amravati) करण्यात आला. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) राज्यपाल आज अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांचा कार्यक्रम हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. राज्यपालांना चप्पल दाखवण्याच्या प्रयत्नात असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
सीमावर्ती भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दरम्यान आज महत्त्वाची बैठक अमरावतीत आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांसंदर्भात तसेच येथील गुन्हेगारीविषयक कारवायांवर अंकुश ठेवण्यासंदर्भात चर्चा होणार आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारींचा निषेध करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला. ज्या ठिकाणी बैठक सुरु होणार होती, त्याच्या काही अंतरावरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित जमाव केला.
राज्यपालांचा ताफा ज्या ठिकाणाहून जाणार होते, त्या रस्त्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्ते चपला दाखवून निषेध व्यक्त करणार होते, मात्र तत्पुर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली.
महापुरुषांचा अवमान प्रकरणी संताप
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्याशी करण्यासंदर्भात वक्तव्य केल्याने महाविकास आघाडीतील पक्षांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. राज्यपालांकडून वारंवार महाराष्ट्राच्या अस्मितेचा, महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान केला जातो.
अशा राज्यपालांना महाराष्ट्रातून हाकलून द्यावे, अशी मागणी महाविकास आघाडीकडून लावून धरण्यात आली आहे. यासाठी मविआतर्फे महामोर्चाचं आयोजनही करण्यात आलं होतं. मात्र अद्याप भगतसिंह कोश्यारींवर काहीही कारवाई झालेली नाही.
याचाच निषेध म्हणून अमरावतीत शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.