शिवसेनेला अपील करण्यास मी योग्य व्यक्ती नाही : अमृता फडणवीस
सध्याच्या परिस्थितीत राज्याचं नेतृत्व करण्यासाठी भाजप सक्षम आहे, असं मत मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं. तसेच, शिवसेनेला भाजपसोबत जुळवून घेण्यास अपील करण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही, असंही त्या म्हणाल्या.
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनशे टक्के देऊन काम केलं आहे, त्यांच्याएवढं काम ‘भूतो न भविष्यति’ कोणीही करु शकत नाही (Amruta Fadnavis). सध्याच्या परिस्थितीला त्यांच्याइतका न्याय आणखी कोणी देऊ शकत नाही. हे भाजप पक्षाचे नेते आणि जनतेला ठाऊक आहे. सध्याच्या परिस्थितीत राज्याचं नेतृत्व करण्यासाठी भाजप सक्षम आहे, असं मत मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं. तसेच, शिवसेनेला भाजपसोबत जुळवून घेण्यास अपील करण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही, असंही त्या म्हणाल्या (Amruta Fadnavis on BJP).
राज्यात सरकार स्थापनेवरुन भाजप आणि शिवसेनेत संघर्ष निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली. पुण्यात त्या एका खासगी कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होत्या.
‘देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी 100 नाही तर 200 टक्के देऊन काम केलं आहे. त्यांच्या इतकं काम कुणीही आजवर केलेलं नाही. सध्या राज्यात जी परिस्थिती उद्भवली आहे, त्या परिस्थितीला त्यांच्याव्यतिरिक्त कुणीही न्याय देऊ शकत नाही’, असं मिसेस मुख्यमंत्री म्हणाल्या. तसेच, फडणवीसांच्या कामामुळेच भाजपला निवडणुकांमध्ये सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत, त्या दृष्टीनेच पुढील वाटचाल होईल याची मला खात्री असल्याचंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं.
शिवाय, गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ता स्थापन करण्यावरुन अनेक घडामोडी सुरू आहेत. भाजपशी जुळवून घ्या, अशी अपील शिवसेनेला करण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही आणि माझं ते ऐकणारही नाही. मात्र, सध्याच्या परिस्थितीत भाजप ज्या स्थानी आहे, तिथे राज्याचं नेतृत्व करण्यासाठी भाजप सक्षम असल्याचं सांगत राज्याचा मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल असं अप्रत्यक्षरित्या अमृता फडणवीस यांनी सांगितलं.
सत्ता स्थापनेवरुन भाजप-शिवसेनेत पेच
राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता 15 दिवस झाले. मात्र, सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. बहुमत मिळवूनही भाजप-शिवसेना युतीने अजूनही सत्ता स्थापन केलेली नाही. दोन्ही पक्षांमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन खडाजंगी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, सत्ता स्थापनेसाठी बहुमत मिळवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीमध्ये भेटीगाठी सुरु आहेत, तर काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी एनडीएतून बाहेर पडावं अशी अट घातल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय परिस्थितीत तणाव निर्माण झाला आहे.
सध्या सत्ता स्थापनेला अवघे दोन दिवस उरले आहेत. येत्या 9 नोव्हेंबरपर्यंत जर राज्यात सत्ता स्थापन झाली नाही, तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल. त्यामुळे सध्या माहाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर दिल्लीही लक्ष ठेऊन आहे.