नवनीत राणा यांच्या प्रचाराला कट्टरवैरी येणार?; रवी राणा यांचा दावा काय?
अमरावतीच्या जागेवरून वाद अजूनही सुरूच आहे. अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी नवनीत राणाच अमरावतीतून लढतील. आनंदराव अडसूळ आणि अभिजीत अडसूळ यांना त्यांचा प्रचार करण्यासाठी यावं लागेल, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. तर, राणा दाम्पत्य हे चलती का नाम गाडी आहे. आमचाच अमरावतीवर दावा असून आम्ही दावा सोडलेला नाही, असं कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली | 29 फेब्रुवारी 2024 : लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विद्यमान खासदारांनी आपला मतदारसंघ सुरक्षित राहील यासाठी आधीच गाठीभेटी सुरू केल्या आहेत. आपल्याच तिकीट मिळेल यासाठी त्यांचीही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. तर जे पूर्वी खासदार होते आणि आता माजी खासदार झालेले आहेत, अशा नेत्यांनीही तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न सुरू केला आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होणार आहेत. त्यामुळे दोन्ही आघाड्यांमध्ये एकाच मतदारसंघातील आजी-माजी खासदार आहेत. विशेष म्हणजे दोन्ही आजी-माजी खासदारांनी एकाच मतदारसंघांवर दावा केल्याने महायुती आणि आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. अमरावतीतही तसंच चित्र होतं. पण त्यात आता बदल होताना दिसत आहे. आमदार रवी राणा यांच्या विधानानांतर हा बदल होताना दिसत आहे.
आमदार रवी राणा यांनी मीडियाशी संवाद साधताना अमरावती लोकसभा निवडणुकी मोठं भाष्य केलं आहे. आनंदराव अडसूळ, अभिषेक अडसूळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी येतील. अडसूळ हे वरिष्ठ नेते आहेत. ते नक्की राणा यांच्यासाठी मते मागतील, असा दावा रवी राणा यांनी केला आहे. रवी राणा यांच्या या दाव्यामुळे नवनीत राणा यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आम्ही एनडीएचे घटक
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या तिकिटाबाबत निर्णय घेतील. आम्ही NDA चे घटक म्हणून त्यांच्यासोबत आहोत. त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल, असं रवी राणा म्हणाले.
ते कायद्याचे उल्लंघन
जातवाचक प्रमाणपत्राबाबत आम्ही कोर्टात 28 पेक्षा जास्त पुरावे दाखल केले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी नवनीत राणा यांची बाजू भक्कमपणे मांडली आहे. काही राजकीय नेते चुकीच्या बातम्या पसरवत आहेत, हे कायद्याचे उल्लंघन आहे, असंही ते म्हणाले.
राणा दाम्पत्य चलती का नाम गाडी
दरम्यान, शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ यांचीही प्रतिक्रिया आली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा म्हणजे ‘चलती का नाम गाडी’ आहेत. यांना दोघांना काही कामधंदे राहिले नाहीत. आजही शिवसेनेचा अमरावतीवर दावा आहे. त्या ठिकाणी आनंदराव अडसूळ हेच शिवसेनेचे उमेदवार आहेत. उलट नवनीत राणा आणि रवी राणा यांनाच अडसूळ यांच्या प्रचाराला यावे लागेल, असं अभिजीत अडसूळ यांनी म्हटलं आहे.
विषयच संपला
नवनीत राणा आणि रवी राणा यांना पैशाचा माज आला आहे. पैसे देऊन सुप्रीम कोर्टही विकत घेऊ शकतो असं त्यांना वाटतंय. तशा अविर्भावात ते वागत आहेत. अजून निर्णय यायचा आहे. दोन आठवड्याचा कालावधी अजून बाकी आहे. तरीही अशा पद्धतीने विधानं करणं हा पोरखेळ आहे. नवनीत राणा यांची पूर्ण वंशावळ आम्ही काढली. सुप्रीम कोर्टात गेलो, मग तिथे त्यांनी कसं त्याचं वजन वापरलं ते देखील आम्ही पाहिलं. त्यामुळे त्यांनी बोलताना तारतम्य ठेवावं. अमरावतीच्या जागेवर आमचा दावा कायम आहे. आनंदराव अडसूळच ती जागा लढवतील. विषयच संपला, असंही कॅप्टन अभिजीत अडसूळ म्हणाले.