अनंत हेगडेंना गोडसेप्रेम भोवले? मोदींच्या मंत्रीमंडळातून बाहेर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य 57 मंत्र्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांमध्ये अनेक नवे चेहरे आहेत. दुसरीकडे अनेक जुन्या चेहऱ्यांना यावेळी मंत्रीमंडळातून वगळण्यात आले आहे. यापैकी एक प्रमुख नाव अनंत हेगडे यांचे आहे. हेगडे यांच्या वारंवार केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच त्यांना मंत्रीमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे राजकीय विश्लेषकांचे […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य 57 मंत्र्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांमध्ये अनेक नवे चेहरे आहेत. दुसरीकडे अनेक जुन्या चेहऱ्यांना यावेळी मंत्रीमंडळातून वगळण्यात आले आहे. यापैकी एक प्रमुख नाव अनंत हेगडे यांचे आहे. हेगडे यांच्या वारंवार केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच त्यांना मंत्रीमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
अनंत हेगडे कर्नाटकमधील उत्तर कन्नड मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. मोदींच्या मागील मंत्रीमंडळात ते कौशल्य विकास मंत्रालयात राज्यमंत्री होते. मात्र, आपल्या मंत्रालयाच्या कामाऐवजी वारंवार दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सारखे माध्यमांमध्ये चर्चेत असणाऱ्या हेगडेंना मंत्रीमंडळातून वगळण्यात आले.
“भाजप संविधान बदलण्यासाठी सत्तेत आले”
अनंत हेगडेंनी डिसेंबर 2017 मध्ये भाजप संविधान बदलण्यासाठी सत्तेत आल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, ‘जे स्वतःला धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगतात त्यांना हे माहिती नाही की त्यांचे रक्त काय आहे? संविधान स्वतःला धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगण्याचा अधिकार देते, मात्र संविधानात अनेकवेळा बदल झाले आहेत. आम्हीही त्यात बदल करु. आम्ही त्यासाठीच सत्तेत आलो आहोत.’
“टीपू सुल्तान बलात्कारी ते गोडसे देशभक्त”
अनंत कुमार हेगडे यांनी टिपू सुल्तानला बलात्कारी म्हटले होते. दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच त्यांनी प्रज्ञा ठाकुरच्या नथूराम गोडसेला देशभक्त म्हणण्याच्या वक्तव्याचे समर्थन केले होते. ठाकूर यांनी गोडसेंना देशभक्त म्हणून 7 दशकांनंतर हा विषय चर्चेत आणला आहे. तसेच गोडेंबाबतच्या जुन्या प्रतिमा बदलत त्यांना दिलेल्या शिक्षेचा निषेध केला आहे, असे मत हेगडेंनी व्यक्त केले होते. प्रज्ञा ठाकूर यांच्यावर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर त्यांच्यावर माफी मागण्याची नामुष्की आली. त्यानंतर अनंत हेगडेंनी ट्वीट करत म्हटले, “ठाकूर यांनी माफी मागण्याची गरज नाही. हे स्विकार करण्याची वेळ आता आली आहे. आत्ता नाही करायचे तर मग कधी?”
दरम्यान, काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलीट केले आणि आपले ट्विटर हँडल हॅक झाल्याचे दुसरे ट्विट केले. त्यानंतर हेगडेंचे ट्विटर हॅक झाले होते की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही, मात्र त्यांचे मंत्रीपद हॅक झाल्याचे वृत्त आले.
अनंत हेगडेंची अन्य काही वक्तव्ये
‘जो हिंदू मुलींना स्पर्श करेल, त्यांचे हात शिल्लक राहायला नको.’
‘ताजमहल आधी तेजो महाल होता. त्याचे नंतर नाव बदलून ताजमहल करण्यात आले. जर आपण असेच झोपून राहिलो, तर एक दिवस प्रत्येकाच्या घराचे नावही बदलले जाईल. आपल्या रामाला जहांपनाह आणि सीतेला बीवी म्हटले जाईल.’