अंधेरीसाठी शिवसेनेनं रणशिंग फुंकलं, ‘या’ उमेदवाराचं पोस्टर झळकलं…
अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघात 3 नोव्हेंबर रोजी मतदान होईल तर 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कुणाला मिळणार, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
मुंबईः राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना (Shivsena) आणि शिंदे सेना-भाजप (Shinde-BJP) यांच्यात सर्वात महत्त्वाचा सामना रंगणार आहे. अंधेरी पूर्व (Andheri East By poll Election) विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूक पुढील महिन्यात होतेय. हा मुंबई महापालिकेचा ट्रेलर समजला जातोय. आमदार रमेश लटके यांच्या अकस्मात निधनामुळे ही जागा रिक्त आहे. त्यांच्या पत्नी ऋतूजा लटके यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी दिली आहे. ऋतूजा लटके यांचं पोस्टर आज शिवसेनेतर्फे झळकवण्यात आलंय. विशेष म्हणजे हा महाविकास आघाडीचा उमेदवार असल्याचं या पोस्टर स्पष्ट दर्शवण्यात आलंय.
अंधेरीत शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपच्या उमेदवाराचं थेट आव्हान असेल. अर्थातच याला शिंदे गटाचं समर्थन असेल. भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुरजी पटेल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. 2019 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाल्यामुळे मुरजी पटेल नाराज होते. त्यावेळी ते अपक्ष म्हणून निवडणुकीत उभे राहिले होते.
रमेश लटके हे दोन वेळा आमदार होते. 11 मे 2022 रोजी दुबई दौऱ्यावर असताना त्यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी शिवसेना नेमकी कुणाचं आणि धनुष्यबाण कुणाचं याचा निर्णय होण्यासाठी शिंदे गट आग्रही आहे. या दोन्ही गटाला निवडणूक आयोगाने पक्षावर दावा ठोकणारी कागदपत्र दाखल करण्यास सांगितलं होतं.
आज दुपारपर्यंत दोन्ही गटातर्फे निवडणूक आयोगाकडे कागदपत्र सुपूर्द केली जातील. त्यानंतर निवडणूक आयोगाचा निकाल कधीपर्यंत येईल, ते कळेल.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघात 3 नोव्हेंबर रोजी मतदान होईल तर 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कुणाला मिळणार, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.