शिंदे गटाची मोठी खेळी, ऋतुजा लटकेंच्या याचिकेवरील निकालानंतर रात्रीच…
ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याविषयीचा निकाल हायकोर्टानं दिल्यानंतर उद्धव ठाकरे गट आनंदात आहे. पण शिंदे गट त्यापुढील खेळी खेळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गिरीश गायकवाड, मुंबईः अंधेरी पूर्व मतदार (Andheri East By Poll) संघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी हाती आली आहे. शिवसेनेच्या वतीने ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा मंजूर करून घ्यावा, असे आदेश नुकतेच मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. न्यायालयात न्याय मिळाल्याने शिवसेनेच्या (Shivsena) गोटात आनंद साजरा होत असतानाच शिंदे गट पुढील खेळी करण्याच्या तयारीत आहे. आज रात्रीतूनच शिंदे गटातर्फे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा राजीनामा पालिकेच्या वतीने उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत मंजूर करावा, असे आदेश नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटातील उमेदवार कोण असेल, हे स्पष्ट झाले आहे. ऋतुजा लटके या महापालिकेत क्लार्क होत्या. उद्या त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने अंधेरी निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करतील.
ऋतुजा लटके यांच्याविरोधात भाजप मुरजी पटेल यांना उमेदवारी देणार असल्याची आतापर्यंत चर्चा होती. मात्र भाजपच्या वतीने तशी अधिकृत घोषणा झालेली नाही. तर शिंदे गट ऋतुजा लटके यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत होता, असा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे.
त्यामुळेच ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यात अडथळे निर्माण करण्यात आले, असा आरोपही उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आला. मात्र हायकोर्टाने ठाकरे गटाला दिलासा दिल्यानंतर आता शिंदे गट त्यापुढील खेळी करणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय.
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्याची उद्याची शेवटची तारीख आहे. आज रात्रीतूनच शिंदे गट उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आता शिंदे गट कुणाला उमेदवारी देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुरजी पटेल यांनाच शिंदे गटाच्या तिकिटावर निवडणूकीला उभे केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
निकालानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया….
2019 मधील विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर अंधेरी पूर्वची जागा शिवसेनेसाठी सोडण्यात आली होती. शिवसेनेतर्फे रमेश लटके येथे उभे होते.
त्यावेळी मुरजी पटेल यांनी भाजपशी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. रमेश लटकेंविरोधात त्यांचा 45 हजार मतांनी पराभव झाला होता. आता पटेल यांनाच रमेश लटकेंच्या पत्नीविरोधात उभे करण्याचा प्लॅन भाजपचा होता. आता शिंदेसाठी भाजप हा उमेदवार सोडू शकते का, अशी शंका उपस्थित केली जातेय.