अंधेरीत काय घडतंय? मुरजी पटेल यांचा फोन बंद? संपर्क कार्यालयात अचानक शांतता….
भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या कार्यालयात काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी दिसायची. भाजप नेते भेटायचे पण आज इथे शांतता आहे.
गोविंद ठाकूर, मुंबईः राज्याचं लक्ष लागलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीत दररोज एक नवा ट्विस्ट येतोय. प्रचंड राजकीय घडामोडींनंतर ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके तर भाजपकडून मुरजी पटेल यांच्यात जोरदार सामना रंगणार असं चित्र होतं. पण रविवारी अचानक ही निवडणूक बिनविरोध होऊ देण्याच्या मागणीने जोर धरला. आणि आज तर मुरजी पटेल यांच्या कार्यालयात अचानक शांतता दिसून येतेय. कालपर्यंत निवडणुकीच्या रंगात, कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुललेलं हे ऑफिस आज अचानक स्तब्ध झालंय. कदाचित पुढे कोणता तरी मोठा निर्णय होणार, अशीच चिन्ह दिसतायत…
टीव्ही9 च्या प्रतिनिधींनी या बदललेल्या चित्राबाबत थेट मुरजी पटेल यांनाच विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र पटेल यांचाही फोन बंद आहे. आज सकाळपासूनच मुरजी पटेल यांनी फोन बंद ठेवला असून ते पुढील आदेशाची वाट पाहत आहेत, असं म्हटलं जातंय.
रविवारी अंधेरी पोटनिवडणूक बिन विरोध करण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार यांनी केली. त्यानंतर या मतदारसंघातील चित्रच पाटललं आहे.
भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या कार्यालयात एकेकाळी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी दिसायची. भाजप नेते भेटायचे पण आज इथे शांतता आहे.
शिंदे गटातील काही नेत्यांचीदेखील ही निवडणूक बिनविरोध होण्याची मागणी आहे. प्रताप सरनाईक यांनीही अशी प्रतिक्रिया दिली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात याच विषयावर बैठक होतेय.
शिंदे-भाजपमधील या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर अंधेरी पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याची चिन्ह आहेत. आज 17 ऑक्टोबर हा या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटचा दिवस आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती. यासाठी 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत आहे.
रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आली आहे. तर भाजपचे मुरजी पटेल यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे.