मातोश्रीवर रात्रभर खलबतं!! ऋतुजा लटके गैरहजर?
या बैठकीला शिवसेना नेते कमलेश राय यांच्यासह प्रमोद सावंतही उपस्थित होते. शिवसेनेच्या प्लॅन बी मधील उमेदवारांमध्ये या नेत्यांचा समावेश असल्याचं म्हटलं जातंय.
विनायक डावरुंग, मुंबईः उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर (Matoshree) रात्री उशीरापर्यंत बैठकांचं सत्र सुरु होतं. अंधेरी पूर्व विधानसभा (Andheri East By Poll) मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईचं वातावरण चांगलंच तापलंय. पक्षाचं नाव, चिन्ह यापासून अगदी उमेदवार उभा करण्याच्या प्रक्रियेसाठी शिवसेनाला कोर्टात धाव घ्यावी लागतेय. शिवसेनेच्या संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांना निवडणुकीत उतरण्याआधी महापालिकेतील लिपिक पदाचा राजीनामा द्यावा लागलाय. मात्र हा राजीनामा पालिकेकडून स्वीकारण्यातच येत नाहीये.
त्यामुळे शिवसेनेने कोर्टात धाव घेतली आहे. लटके यांच्या राजीनाम्यावर काही वेळातच सुनावणी होईल. मात्र ऋतुजा लटके यांचा रामीनामा मंजूर झाला नाहीतर शिवसेनेचा प्लॅन बी काय आहे, याची जोरदार चर्चा सुरु आहे.
याच संदर्भाने शिवसेना प्रमुखांच्या मातोश्री या निवासस्थानी रात्रभर महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठका झाल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकांना ऋतुजा लटके यांचा मुलगा उपस्थित होता. मात्र त्या स्वतः बैठकीला गैरहजर होत्या.
त्यामुळे लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नाही तर त्यांची कशा प्रकारे समजूत घालायची, याविषय़ी बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय. तसेच शिवसेनेचे या जागेसाठी पुढील उमेदवार कोण, याविषय़ी देखील चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय.
या बैठकीला शिवसेना नेते कमलेश राय यांच्यासह प्रमोद सावंतही उपस्थित होते. शिवसेनेच्या प्लॅन बी मधील उमेदवारांमध्ये या नेत्यांचा समावेश असल्याचं म्हटलं जातंय.
ऋतुजा लटके यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आधी सरकारी नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भाजप दबाव टाकतंय. त्यामुळे ते राजीनामा मंजूर करून घेत नाहीयेत, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात येतोय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा लटके यांनी दोन वेळा राजीनामा पत्र सादर केले. मात्र पहिल्या पत्रात निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत राजीनाम्याची अट शिथिल करावी, असं म्हटलंय. तर नंतरच्या 3 सप्टेंबर रोजीच्या पत्रात लवकरात लवकर राजीनामा मंजूर करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
त्यांच्या अर्जातील या दोन वेगवेगळ्या विनंत्यांमुळेच राजीनामा अडकवून ठेवण्यात आल्याचं म्हटलं जातंय.