मुंबई – राज्यसभा निवडणुकांची (Rajyasabha Election) सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर आता भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे. पियुष गोयल यांना संधी मिळणार हे अपेक्षितच होते, मात्र बोंडे यांचे नाव अनपेक्षित मानले जात आहे. तिसरा उमेदवार भाजपा देणार का, याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप कोण उमेदवार देणार? याबाबत सस्पेन्स होता. मात्र अखेर आज हा सस्पेन्स संपला आहे. मात्र यातल्या एका उमेदवारीने सर्वांनाच सरप्राईज दिलं आहे म्हणावं लागेल. आधी फडणवीसांना या उमेदवारीबाबत विचारले असता फडणवीस हे निर्णय वरिष्ठ पातळीवर होतात, असे म्हणत हा सस्पेन्स आणखी वाढवत होते.
राज्यसभेच्या तीन जागा गेल्या वेळी भाजपाकडे होत्या. त्यात पियुष गोयल, विकास महात्मे आणि विनय सहस्रबुद्धे यांना संधी मिळाली होती. यातील पियुष गोयल हे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानण्यात येत होती. मात्र इतर दोन जागांसाठी विनोद तावडे, विजया रहाटकर यांच्या नावांची चर्चा होती. मात्र अनपेक्षितपणे विदर्भातील माजी कृषीमंत्री असलेल्या अनिल बोंडे यांना उमेदवारी मिळाली आहे.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपाचे यावेळी दोनच उमेदवार निवडून येईल एवढे संख्याबळ पक्षाकडे आहे. एका जागेसाठी ४२ मतांची गरज आहे. भाजपाचे संख्याबळ १०५ आहे, तिसऱ्या उमेदवारासाठी असलेली आवश्यक मते त्यांच्याकडे नाहीत. अपक्ष आणि भआजपाची इतर मते मिळून भाजपाकडे २७ मते आहेत. तर याच जागेसाठी महाविकास आघाडीकडे त्यांचे प्रत्येकी एकेक उमेदवार वगळता, ४१ मते शिल्लक राहणार आहेत. ही जागा शिवसेना लढवणार असल्याचे संजय राऊत यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. शिवसेनेसाठी यासाठी राऊत आणि संजय पवार असे उमेदवारही जाहीर केले आहेत. भाजपाने अद्यापही तिसऱ्या जागेचा निर्णय जाहीर केलेला नाही.
राज्यसभेसाठी शिवसेनेकडून सर्वात आधी संजय राऊत आणि संजय पवार यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही पुन्हा प्रफुल्ल पटेल यांना संधी दिली आहे. तर भाजपकडून आता पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांचं नाव निश्चित झालं आहे. मात्र काँग्रेसच्या गोटातला सस्पेन्स अजूनही संपला नाही. काँग्रेसने अद्याप कुणाचेही नाव जाहीर केले नाही. त्यामुळे आता काँग्रेस ही जागा कुणाला देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.