“आघाडीपेक्षा ‘महाविकास आघाडी सरकार’ अधिक मजबूत” अनिल देशमुखांचा दावा, खडसेंसोबत नंदुरबार दौरा
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे अनिल देशमुख यांच्या हस्ते श्री नारायण मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.
नंदुरबार : आघाडी सरकारपेक्षा महाविकास आघाडी सरकार अधिक मजबूत आणि एकसंघ आहे, असा दावा राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अनिल देशमुख यांनी केला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे निवडक पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी हे सरकार पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादीत नुकतेच आगमन केले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेही त्यांच्यासोबत नंदुरबार दौऱ्यावेळी होते. (Anil Deshmukh lays stone foundation of Narayan temple in Nandurbar)
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे फक्त उत्तर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा होईल, अशी खात्री अनिल देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली. एकाच गाडीने अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे या दोन्ही नेत्यांनी संपूर्ण दौरा पूर्ण केला.
गट-तट बाजूला ठेवून पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचनाही देशमुखांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिल्या. सरकार पडेल अशा निराधार चर्चा भाजपचे काही नेते घडवून आणत असल्याचा टोलाही अनिल देशमुख यांनी यावेळी लगावला.
श्री नारायण मंदिराचे भूमिपूजन
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे अनिल देशमुख यांच्या हस्ते श्री नारायण मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळेस गृहमंत्र्यांसोबत एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री नारायण मंदिर हे सर्वात भव्य मंदिर उभारले जाणार असल्याचं यावेळेस संस्थेच्या व्यवस्थापकांनी सांगितले. या मंदिरामध्ये एकवीस टनांची भगवान विष्णूंची पद्मासनावर विराजमान मूर्ती स्थापन केली जाणार आहे. अष्टधातूच्या या मूर्तीची किंमत दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.
“गृहमंत्री अनिल देशमुख आज एका मंदिराचे भूमिपूजन करणार आहेत. ही बाब अभिनंदनीय आणि स्वागतार्हच आहे. पण आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची परवानगी घेतली का?” असा प्रश्न भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी केला होता. (Anil Deshmukh lays stone foundation of Narayan temple in Nandurbar)
@AnilDeshmukhNCP आज एका मंदिराचे भूमिपूजन करत आहेत, ही बाब अभिनंदनीय आणि स्वागतार्हच आहे. पण आपण @PawarSpeaks आणि @OfficeofUT यांची परवानगी घेतलीत का ? कारण ‘काहींना वाटतं की मंदिर बांधल्याने कोरोना जाईल !’ आणि ‘ई भूमिपूजन’ करावे अशी या आपल्या नेत्यांची अनुक्रमे मते आहेत. pic.twitter.com/Xbvzd7zZS3
— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) November 1, 2020
संबंधित बातम्या :
गृहमंत्र्यांनी मंदिराच्या भूमिपूजनासाठी ठाकरे-पवारांची परवानगी घेतली का? भाजपचा खोचक सवाल
(Anil Deshmukh lays stone foundation of Narayan temple in Nandurbar)