मुंबई : महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत, प्रगत राज्याचा माजी गृहमंत्री अनेक महिन्यांपासून गायब आहे. महाराष्ट्राला ही गोष्ट भूषणावह नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या गायब होण्याबाबत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खुलासा करावा, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Uapadyay) यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. (Keshav Upadhyay’s challenge to clarify the role of NCP regarding Anil Deshmukh)
उपाध्ये यांनी सांगितले की, अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देताना सांगितले होते की, आपण सीबीआय, ईडी कडून होणाऱ्या चौकशीला सर्व प्रकारचे साह्य करू. मात्र राजीनामा दिल्यानंतर देशमुख यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. आपल्याला अटक होऊ नये यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर देशमुख यांनी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही देशमुख यांचा युक्तीवाद अमान्य केला आहे. आता देशमुख हे गायब झाले आहेत. अनिल देशमुख हे का गायब आहेत, ते जनतेसमोर तपास यंत्रणांसमोर का येत नाहीत याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस ने तातडीने करावा, असेही श्री. उपाध्ये यांनी नमूद केले.
उपाध्ये यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांवरही जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांनी धार्मिक व राजकीय कार्यक्रम थांबविले पाहिजेत अशा आशयाचे वक्तव्य केले आहे. मात्र गणेशोत्सवासारखा सण तोंडावर आल्यावरच मुख्यमंत्र्यांना अशी वक्तव्ये का करावीशी वाटतात याचे आश्चर्य वाटते. मंदिरे, चित्रपटगृहे वगळता राज्यात सर्व व्यवहार सुरळीत चालू आहेत. फक्त मंदिरांत जाण्याने कोरोना पसरतो का याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करण्याची गरज आहे, असे उपाध्ये यांनी सांगितले.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. 100 कोटी रुपयांचे वसुली आदेश दिल्याच्या आरोपातील मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने लूकआऊट नोटीस जारी केली आहे. या लूकआऊट नोटीसमुळे अनिल देशमुखांना देश सोडता येणार नाही. अनिल देशमुख यांना चौकशीसाठी आतापर्यंत 5 वेळा समन्स पाठवण्यात आलं आहे, मात्र ते ईडीसमोर हजर झाले नाहीत, त्यामुळे ईडीने लूकआऊट नोटीस जारी केल्याची माहिती आहे.
“100 कोटी रुपये खंडणी घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनिल देशमुख यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस बजावली आहे. यामुळे आता देशमुख यांना देश सोडून जाता येणार नाही. लूकआऊट नोटीसनुसार अनिल देशमुख यांना देशभरातून शोधून काढण्याचे अधिकार मिळाले आहेत. त्याखेरीज देशभरातील विमानतळांनादेखील नोटीस गेली आहे. जेणेकरून देशमुख हे देश सोडून जाऊ शकणार नाहीत. तसा प्रयत्न त्यांनी केल्यास त्यांना विमानतळावरच थांबवले जाईल”, असं अॅड. जयश्री पाटील म्हणाल्या आहेत.
इतर बातम्या :
अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने 100 कोटी रुपये द्या, नरेंद्र पाटलांची मागणी
उद्धव ठाकरे इलेव्हन दिवाळीपर्यंत तुरुंगात, आव्हाड तुम्हीही बॅग भरा; किरीट सोमय्यांचा थेट इशारा
Keshav Upadhyay’s challenge to clarify the role of NCP regarding Anil Deshmukh