छगन भुजबळ खुलेआम बोलत नसतील, पण… अनिल देशमुख यांचं मोठं विधान काय?
आघाडीची बैठक लिमिटेड लोकांची असेल. काही इश्यूबद्दल बोलायचं असेल. जेव्हा मोठी मिटिंग असते तेव्हा सर्व नेत्यांना बोलावलं जातं. आमच्या आघाडीत कोणी मोठा आणि छोटा भाऊ नाही. आम्ही सर्व एकत्र आहोत. एकोप्याने काम सुरू आहे. पुढची विधानसभा आहे, ती आम्ही एकत्र बसून लढू आणि जिंकू, असं माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
आता मला राजकारणात 40 वर्ष झालीत. मला संसदेत जायचं होतं. ही इच्छा मी बोलून दाखवली होती. मला लोकसभा मिळाली नाही. राज्यसभाही मिळाली नाही. सहा वर्षापूर्वीही मी राज्यसभेत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हाही निर्णय घेतला गेला नाही, अशी खदखद राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. भुजबळ यांच्या या विधानानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. या सर्व प्रकरणावर छगन भुजबळ आता खुलेआमपणे बोलत नसतील. पण त्यांना मनातून नक्कीच दु:ख झालं असेल, असं शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.
टीव्ही9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची मुलाखत घेतली होती. यावेळी भुजबळ यांनी ही खदखद व्यक्त केली. त्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. छगन भुजबळ यांना राज्यसभेत जाण्याची इच्छा होती. त्यांना राज्यसभा का दिली नाही? हे अजितदादांचा गट ठरवेल. तो त्यांचा निर्णय आहे. अजितदादा गटाच्या नेत्यांनी एकत्र बसून तसा निर्णय घेतला असावा. साहजिकच आहे. ते सीनिअर नेते आहेत. त्यांना लोकसभा दिली नाही, राज्यसभा मिळाली नाही. आज जरी ते बाहेर खुलेआमपणे बोलत नसतील. पण मनातून दु:ख झालं असेल, असं अनिल देशमुख म्हणाले.
जयंत पाटील यांचा आग्रह होता
आमची एकी काही लोकांना पाहवली नाही, असं विधान आमदार विश्वजीत कदम यांनी केलं होतं. विश्वजीत कदम यांच्या टीकेचा रोख शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या दिशेने होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. संसदीय बोर्डात जेवढ्या मिटिंग झाल्या त्यात सुरुवातीपासून दोन जागांचा घोळ होता. एक सांगली आणि दुसरी भिवंडीची. सांगलीसाठी शिवसेनेचा आग्रह होता आणि काँग्रेसचाही होता. जयंती पाटील हे त्या जिल्ह्यातील आमदार आहेत. त्यामुळे ती जागा काँग्रेसला द्यावी असा जयंत पाटील यांचा आग्रह होता. संसदी बोर्डाच्या मिटिंगमध्ये ते वारंवार बोलायचे. काँग्रेस आणि शिवसेनेने नंतर एकत्र बसून निर्णय घेतला असेल. पण ही जागा काँग्रेसलाच मिळावी, असा जयंत पाटील यांचा आग्रह होता. त्या प्रत्येक बैठकीला मी होतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
वंचितला सोबत घेणार?
विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, लोकसभा निवडणुकीत वंचितला सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न होता. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. पण ते सोबत आले नाही. मात्र, आता तसा काही विषय आलेला नाही, असं त्यांनी सांगितलं.