21 महिन्यांनी अनिल देशमुख नागपुरात दाखल, भरगच्च फुलांनी सजली जिप्सी, रस्ते कार्यकर्त्यांनी ओसंडले
नागपूरमधील अनिल देशमुख यांच्या घरामसोर मोठ मोठे कट आउट्स आणि बॅनर्स लावण्यात आले आहेत. संघर्ष योद्धा, टायगर इज बॅक अशा आशयाचा मजकूर त्यावर लिहिण्यात आलाय.
गजानन उमाटे, सुनिल ढगे, नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) तब्बल 21 महिन्यानंतर स्वगृही नागपुरात परतले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. नागपूर विमानतळाबाहेर असंख्य कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. अनिल देशमुख यांचं काही मिनिटांपूर्वीच नागपूर विमानतळावर आगमन झालंय. त्यानंतर भरगच्च फुलांनी सजलेल्या जिप्सीतून मिरवणूक काढत ते घरी पोहोचतील. नागपूरमधील अनिल देशमुख यांच्या घरामसोर मोठ मोठे कट आउट्स आणि बॅनर्स लावण्यात आले आहेत. संघर्ष योद्धा, टायगर इज बॅक अशा आशयाचा मजकूर त्यावर लिहिण्यात आलाय.
क्रेनने पुष्पवृष्टी
अनिल देशमुख हे जवळपास सव्वा वर्षानंतर घरी पोहोचणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी पुष्पवृष्टी केली जाणार आहे. देशमुख यांच्या घरासमोर मोठी क्रेन आणली गेलीय. क्रेनच्या सहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाईल. या क्रेनवर राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे आणि अनिल देशमुख यांच्या समर्थनाचे पोस्टर, हार फुलांनी सजवण्यात आले आहे.
भरगच्च फुलांनी सजली जिप्सी
अनिल देशमुख यांची नागपूर शहरातून मिरवणूक काढण्यासाठी एक जिप्सी रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आली आहे. विमानतळावरून उतरल्यानंतर ते याच जिप्सीतून नागपुरातील घरापर्यंत पोहोचतील.
शहरभर होर्डिंग्ज
अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी त्यांचा बंगला फुलांनी सजलाय. घराच्या प्रवेशद्वाराजवळ अनिल देशमुख, शरद पवार यांचे कटाआऊट लागले आहेत. ‘संघर्ष योद्धा’ म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनिल देशमुख यांचे शहरभर होर्डिंग्ज लावले आहेत.
कार्यकर्ते जमले, मिठाई वाटप
अनिल देशमुख यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे. देशमुख यांच्या आगमना प्रसंगी कार्यकर्त्यांकडून मिठाई वाटलाही सुरुवात झाली आहे.
21 महिन्यानंतर नागपुरात
अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर ईडीने देशमुख यांना अटक केली होती. ते एक वर्ष दीड महिना तुरुंगात होते. आता कोर्टाने देशमुख यांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांनी कोर्टाला मुंबई बाहेर जाण्याची परवानगी मागितली होती. ती मान्य करण्यात आली.
त्यानंतर अनिल देशमुख आज शनिवारी नागपुरात दाखल होत आहेत. देशमुख हे मुंबईहून नागपुरात येतील. विमानतळावरून ते कुटुंबियांसोबत वर्धा मार्गावरील साईबाबा मंदिरात जाणार आहेत. संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. त्यानंतर ते घरी परततील.