Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या अडचणी आणि कोठडी मुक्काम आणखी वाढला, 11 एप्रिलपर्यंत CBI कोठडी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आजही दिलासा मिळाला नाहीच, कारण अनिल देशमुखांच्या सीबीआय कोठडीत आणखी वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांना 11 एप्रिलपर्यंत CBI कोठडी देण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात सध्या अनिल देशमुख कोठडीत आहेत.
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आजही दिलासा मिळाला नाहीच, कारण अनिल देशमुखांच्या सीबीआय कोठडीत (CBI Custody) आणखी वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांना 11 एप्रिलपर्यंत CBI कोठडी देण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात (money laundering) सध्या अनिल देशमुख कोठडीत आहेत. या आधी अनिल देशमुख यांच्या जामिनावरील अर्ज विशेष पीएमएलए कोर्टानंही फेटाळला होता 100 कोटी रुपयांच्या वसुली आणि मनी लॉड्रिंगसाठी ईडीनं त्यांना अटक केली होती. अनिल देशमुख हे सध्या कोठडीत आहेत. आता त्यांच्या कोठडीत आणखी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोठडीत असताना पडल्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. दरम्यान, आता मंगळवारी (5 मार्च) रोजी त्यांना जेजे रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अनिल देशमुखांच्या सीबीआय कोठडीत वाढ झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
अनिल देशमुख का अडचणीत आले?
मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त असलेल्या परमबीर सिंहांनी अनिल देशमुखांवर सनसनाटी आरोप केले होते. परमबीर सिंहांनी मुख्यमंत्री आणि शरद पवारांना एक पत्र लिहलं होतं. या पत्राद्वारे त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा सनसनाटी आरोप या पत्रातून करण्यात आला होता.
दरम्यान, यानंतर सचिन वाझे यांच्यावरही याप्रकरणातले प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. त्यांचं निलंबनही करण्यात आलं. तसंच अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आलेली आहे.
परबमीर सिंहानी केलेल्या सनसनाटी आरोपांनंतर अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कोठडीत असलेल्या अनिल देशमुखांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही आहेत. आता पुन्हा एकदा त्यांच्या सीबीआय कोठडीत वाढ झाली आहे.
सीबीआय कोठडी आणि पोलिस कोठडी यात काय फरक?
सीबीआय कोठडी आणि पोलीस कोठडी यात फरक असतो. सीबीआय कोठडी किंवा ईडी कोठडी किंवा आर्थिक गुन्हे शाखेची कोठडी या वेगळ्या असतात. आणि पोलिस तसंच न्यायलयीन कोठडी या वेगळ्या असतात. एखादार आरोपी हा मोठा गुन्हे आहे, आणि तो पळून जाण्याचा संशय असेल, तर अशा वेळी आरोपीला पोलीस कोठडी सुनावली जाते. तर दुसरीकडे न्यायलयीन कोठडी ही पोलीस कोठडीपेक्षा वेगळी असते. कोरामध्ये देण्यात आलेल्या उत्तरानुसार न्यायलयीन कोठडीचा काळ हा तपासादरम्यान, 15 दिवसांपेक्षा अधिक नसतो. न्यायलायीन कोठडी पोलिसांच्या ताब्यात नसते. तर इतर सीबीआय, ईडी आणि तत्सम तपास यंत्रणाही चौकशीसाठी संशयीत आरोपीला आपल्या कार्यालयात चौकशीसाठी ठेवतात. या कार्यालयात ठेवण्यात येण्याच्या प्रक्रियेला सीबीआय कोठडी, ईडी कोठडी असं संबोधलं जातं.