रात्री उशीरा निवडणूक आयोगाचा एक मेल अन् शिवसेनेच्या अडचणीत आणखी वाढ
सध्या धनुष्यबाण चिन्हावरून राजकारण चांगलचं तापलं आहे. त्यातच रात्री उशीरा निवडणूक आयोगाच्या वतीने एक मेल शिवसेनेला पाठवण्यात आला आहे.
मुंबई : सध्या धनुष्यबाण चिन्हावरून राजकारण चांगलचं तापलं आहे. शिवसेना (Shiv sena) आणि शिंदे गट (Eknath Shinde) दोघांकडूनही धनुष्यबाणावर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला द्यायचं याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. शिवसेनेला पुरावा सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार शिवसेनेकडून पुरावे देखील सादर करण्यात आले . मात्र त्यानंतर पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडून (Election Commission) शिवसेनेला मेल आला आहे. सादर केलेले कागदपत्र नियमाप्रमाणे नसल्याचं या मेलमध्ये म्हटलं आहे. तसेच पुन्हा एकदा आज दुपारी दोनपर्यंत कागदपत्र सादर करावेत असा आदेश निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला देण्यात आला आहे. त्यामुळे कागदपत्र आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आता शिवसेनेकडे अवघे काही तासच शिल्लक आहेत.
रात्री उशिरा मेल
याबाबत खासदार अनिल देसाई यांनी टीव्ही 9 मराठीला माहिती दिली आहे. रात्री उशिरा निवडणूक आयोगाचा शिवसेनेला पुन्हा मेल आला. सादर केलेले कागदपत्र हे नियमाप्रमाणे नसल्याचं या मेलमध्ये निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता आम्हाला आज दुपारपर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे. मात्र आम्हाला विश्वास आहे की न्याय मिळेल असं अनिल देसाई यांनी म्हटलं आहे.
शिवसेना वेळ वाढवून मागणार?
निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला कागदपत्र सादर करण्यासाठी आज दुपारपर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे. दुपारी दोनपर्यंत पुरावे सादर करावेत असं निवडणूक आयोगाने आपल्या मेलमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे वेळ वाढवून मागण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या वकिलांकडून देखील आजचीच डेडलाईन का? याबाबत विचारणा करण्यासाठी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवण्यात आले आहे.