Arjun Khotkar | खोतकरांची गाडी कुठे अडलीय? उद्धव ठाकरेंशी बोलून निर्णय घेणार.. सत्तारांना भलतीच घाई, मुहूर्तही सांगितला, वाचा..
खोतकरांचा निर्णय अद्याप झालेला नसला तरीही अब्दुल सत्तारांनी खोतकरांच्या शिंदे गटातील प्रवेशाचा मुहूर्तही जाहीर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.
मुंबईः माजी मंत्री आणि जालना शिवसेनेचे प्रभावी नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्या शिंदे गटात प्रवेश करण्याची चर्चा गेल्या आठवडाभरापासून सुरु आहे. नवी दिल्लीत मागील आठ दिवसांपासून खोतकर दिल्लीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) इतर खासदारांच्या सतत संपर्कात आहेत. त्यांच्या बैठकीचे अनेक व्हिडिओदेखील समोर आले. आज-उद्या ते शिंदे गटात प्रवेशाची घोषणा करतील, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र तसे होताना दिसत नाहीये. शिवसेनेच्या इतर नेत्यांप्रमाणे खोतकरांवरही ईडी किंवा इतर तपास यंत्रणांचा दबाव असल्याचं बोललं जातंय. खुद्द खोतकरांनीही माझ्यावर आणि कुटुंबावर दबाव असल्याचं माध्यमांसमोर सांगितलं. असा दबाव असताना मी कोणता निर्णय घेईन, हे तुम्हीच सांगा.. असे खोतकर म्हणाले. मात्र अद्याप त्यांनी ठोस निर्णय जाहीर केलेला नाही. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून मी निर्णय घेईन, असं नुकतंच त्यांनी माध्यमांना सांगितलं. मात्र औरंगाबादचे आमदार अब्दुल सत्तार यांना फारच घाई झालेली दिसतेय. त्यांनी खोतकरांच्या शिंदे गटात प्रवेशाची वेळही जाहीर करून दिली…
सत्तार, दानवेंची मध्यस्थी कामी येणार?
दिल्लीत जालन्याचे भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीदेखील खोतकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केल्याचे दिसून आले. यासाठी खोतकरांशी असलेले पूर्वीचे वैर विसरण्याचेही आश्वासन दिले. मात्र त्यानंतरही खोतकरांचं समाधान झालं नव्हतं. आज माजी मंत्री आणि औरंगाबाद सिल्लोड मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मघ्यस्थीने सत्तारांचं मन वळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांच्यात आज बैठक होत आहे. या बैठकीनंतर खोतकर एकनाथ शिंदे गटात येतील की नाही हे स्पष्ट होईल.
खोतकर काय म्हणाले?
दरम्यान, आज शुक्रवारी खोतकरांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतरच मी एकनाथ शिंदे गटात जायचं की नाही, याचा निर्णय घेईन, असं वक्तव्य खोतकरांनी केलंय.
अब्दुल सत्तारांनी मुहूर्तही सांगितला..
खोतकरांचा निर्णय अद्याप झालेला नसला तरीही अब्दुल सत्तारांनी खोतकरांच्या शिंदे गटातील प्रवेशाचा मुहूर्तही जाहीर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सत्तारांच्या सिल्लोड मतदार संघात शिंदे भव्य मेळावा घेणार आहेत. याच मेळाव्यात खोतकरांचा शिंदे गटात प्रवेश होईल, असे सत्तारांनी जाहिर केलंय.