मुस्लिम बहुल इंडोनेशियाच्या नोटेवर गणपती आला कसा? कारण पहिल्यांदाच समोर… वाचा Inside Story!
कुणी म्हणतंय गणपतीनं तारलं, कुणी सांगतंय वेगळीच कहाणी, काय आहे नेमकं सत्य?
नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी भारतीय नोटांवर गणपती (Ganpati) आणि लक्ष्मीचा (Laxmi) फोटो छापण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी इंडोनेशियाच्या (Indonesia) नोटांवरील गणपतीचा फोटो छापल्याचा दाखला दिला. आश्चर्य म्हणजे इंडोनेशिया हा मुस्लिम बहुल देश आहे. इथे 80 टक्के लोक मुस्लिम असूनही तेथील नोटांवर गणपतीचा फोटो छापलेला आहे. यामागचं सत्य नेमकं काय आहे, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
केजरीवाल यांची मागणी काय?
भारताच्या नोटांवर एकिकडे गांधीजी तर दुसऱ्या बाजूने गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापला जावा, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. हे सांगतानाच केजरीवाल यांनी इंडोनेशियाचं उदाहरण दिलं. इंडोनेशिया मुस्लिम देश असून त्यांनी गणपतीचा फोटो नोटेवर छापल्याचा दावा केजरीवाल यांनी केलाय.
सध्या सोशल मीडियात सादर झालेल्या इंडोनेशियातल्या २० हजार रुपयांच्या नोटेवर गणपतीचा फोटो आहे. याच्या मागील बाजूला शाळेतल्या वर्गखोलीचा फोटो आहे. त्यात मुले शिकताना दिसतात.
त्यामागची कारणंही सोशल मीडियातून धुंडाळली जात आहेत. इंडोनेशियात पूर्वीच्या काळी हिंदूंची सत्ता होती. पहिल्या शतकात इथे हिंदू राजे होते. त्यामुळे हिंदू धर्म आणि संस्कृतीची छाप इथे प्रामुख्याने दिसते. पण 20 हजार रुपयांच्या नोटेवरच हा फोटो का आला, यामागेही एक स्टोरी सांगितली जातेय.
ही गोष्ट आहे 1997 सालची. त्यावेळी आशिया खंडातील बहुतांश चलन घसरत होते. सगळ्याच देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती.
त्यावेळी इंडोनेशियाच्या अर्थमंत्र्यांना कुणीतरी गणपतीचा फोटो नोटांवर छापण्याचा सल्ला दिला. इंडोनेशियाने असं केलं आणि तो देश आर्थिक संकटातून सावरला. ही कहाणी फक्त सांगितली जातेय.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, 1998 मध्ये एका खास थीमनुसार, ही नोट छापण्यात आली होती. आता ही नोट चलनात नाहीये.
इंडोनेशियातील वरिष्ठ पत्रकार अस्तूदेस्त्रा अंजेगरास्त्री यांच्या मते, इंडोनेशियात गणपतीची मूर्ती ही येथील विविधतेचं प्रतीक आहे.
1998 सालची ही नोट ही शिक्षण या संकल्पनेवर आधारीत होती. इंडोनेशियात गणपतीला कला, बुद्धी आणि शिक्षणाचं प्रतीक मानलं जातं. येथील अनेक शिक्षण संस्थांमध्येही गणपतीचा फोटो आहे.
याच नोटेवर तेथील राष्ट्रीय नायक हजार देवंतरा यांचाहा फोटो आहे. त्यांनी त्यावेळी शिक्षणाचा अधिकार सर्वांना मिळण्यासाठी मोठी मोहीम उघडली होती.
इंडोनेशियात फक्त गणपतीच नाही तर हिंदु धर्मातील इतर प्रतीकांनाही जपलं जातं. १९७० ते 80 च्या दशकात येथे मोठ्या संख्येने लोक हिंदु धर्मात येत होते. त्यामुळे २ टक्केच असले तरीही देशभरात हिंदु लोकांचा प्रसार आहे. येथील प्रतीकांवर हिंदुच नव्हे तर इतर धर्मियांच्या प्रतीकांचीही छाप आहे.