Delhi Election Result : अरविंद केजरीवालांच्या राष्ट्रीय राजकारणाचा मार्ग मोकळा?
आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. या दिमाखदार विजयानंतर अरविंद केजरीवाल राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 चा निकाल जवळपास आला आहे. यात आम आदमी पक्षाने 63 जागांवर आघाडी घेत तिसऱ्यांदा दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकली (Arvind Kejriwal and National Politics). आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. या दिमाखदार विजयानंतर अरविंद केजरीवाल राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय राजकारणात राष्ट्रीय स्तरावर मजबूत विरोधी पक्षनेत्याची उणीव असल्याचं मत अनेक राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी काही प्रमाणात सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून पोकळी भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, लहरी आणि अनियमित राजकीय सक्रीयतेमुळे सध्यातरी राहुल गांधी परिणामकारक होताना दिसत नसल्याचंही बोललं जात आहे. अशा स्थितीत ही पोकळी भरून काढण्यासाठी केजरीवाल यांच्याकडून प्रयत्न केले जाऊ शकतात. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील राष्ट्रीय राजकारणात येण्याआधी गुजरातचे यशस्वी मुख्यमंत्री अशी आपली प्रतिमा तयार केली. या प्रतिमेवरच त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला होता.
राष्ट्रीय स्तरावर सर्व राजकीय विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचं काम अरविंद केजरीवाल करु शकतात. त्यांच्या राजकीय यशामुळे त्यांना देशभरातून मान्यताही मिळू शकते, असं मत काही राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या सुरुवातीच्या राजकीय वाटचालीत देखील राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. आता त्यांच्यासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. यात त्यांच्या काही गुणांमुळे त्यांना फायदा होऊ शकतो, तर त्यांच्यातील काही दोषांचा त्यांना तोटाही होऊ शकतो.
अरविंद केजरीवाल यांची राजकारणातील नम्रता
अरविंद केजरीवाल यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात लोकप्रिय गुण म्हणजे त्यांचा नम्रपणा. अरविंद केजरीवाल यांनी 2015 मध्ये 70 पैकी 67 जागांवर दणदणीत विजय मिळवल्यानंतरही अत्यंत नम्रतेने तो विजय स्वीकारला. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील नम्रपणा ठेवण्याचं आवाहन केलं. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत देखील एकहाती स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर त्यांनी व्यक्तिगत शेरेबाजीऐवजी नम्रपणे आपल्या शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातील योगदानावर बोलण्यास प्राधान्य दिलं.
सर्वसमावेश नवी राजकीय विचारसरणी
अरविंद केजरीवाल यांनी मोठ्या कुशलतेने राजकारणात नव्या चेहऱ्यांना संधी दिली. देश-विदेशात काम करणाऱ्या तरुणांना त्यांनी राजकारणात येण्यासाठी भाग पाडलं. ही तरुणांची उर्जा आणि समावेशकता ही देखील केजरीवाल यांची ताकद आहे. केजरीवाल यांच्यासोबत असलेल्या अनेक स्तरातील युवा चेहऱ्यांमुळे त्यांना डावे किंवा उजवे अशा श्रेणीत विभागणंही कठीण जातं. डावे आणि उजवे दोन्ही गट केजरीवाल यांना आपल्यातील मानत नाही. राष्ट्रीय राजकारणात आपली जागा तयार करण्यासाठी केजरीवाल यांना हीच ताकद आणि सर्वमावेशक राजकारणाचा मार्ग कायम ठेवावा लागणार आहे.
सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर
अरविंद केजरीवाल यांनी सामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यावर भर देत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या याच कामामुळे ते मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहेत. शाळा, मोहल्ला रुग्णालये, महिला सुरक्षा, स्वच्छता, वीज, पाणी, रस्ते अशा अनेक विषयांवर त्यांनी प्रभावी योजना आणून अंमलबजावणी केली. विशेष म्हणजे आपल्या कामाविषयी बोलताना केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यक्तिगत टीकेला अजिबात उत्तर दिलं नाही. उलट त्याकडे दुर्लक्ष करत विकासाच्या मुद्द्यावर आग्रही मांडणी केली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारकाळात अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या धार्मिक मांडणीला चोख प्रत्युत्तर दिलं. तसेच विवादास्पद विषयांपासून अंतर ठेवलं. भाजपकडून संपूर्ण प्रचारात शाहीन बाग, जामिया, जेएनयू इत्यादी विषयांवर भर देण्यात आला. मात्र, केजरीवाल यांनी आपल्या आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी या मुद्द्यांवरच मांडणी केली.
पक्षातील सहकाऱ्यांना सोबत ठेवावं लागणार
अरविंद केजरीवाल यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात करताना सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक दिग्गजांना सोबत घेतलं. यात योगेंद्र यादव, कुमार विश्वास, प्रशांत भूषण, त्यांचे वडील प्रसिद्ध वकील आणि माजी कायदामंत्री शांती भूषण, आनंद कुमार, अजीत झा यांचा समावेश होता. मात्र, नंतरच्या काळात त्यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप झाला आणि हे सर्व सोबती बाहेर पडले. त्यामुळे केजरीवाल यांना याची पुनरावृत्ती टाळावी लागणार आहे.
भावनिक मुद्द्यांवर सावध भूमिका घ्यावी लागणार
काश्मीर, राम मंदिर, सैन्य, पाकिस्तान अशा मुद्द्यांवर भूमिका घेताना अरविंद केजरीवाल यांचा कस लागणार आहे. या सर्व मुद्द्यांवर राजकारण करण्यात भाजपने सध्यातरी आघाडी घेतली आहे. या विधानसभा निवडणुकीतही भाजपकडून आपला याच मुद्द्यांवर घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, केजरीवाल यांनी संयमी भूमिका घेत त्यांना पराभूत केलं. आता येणाऱ्या काळात राष्ट्रीय स्तरावर काम करताना त्यांना प्रसिद्ध रणनितीकार प्रशांत किशोर यांचीही मदत मिळण्याची शक्यता आहे.
लहान राज्यांवर लक्ष केंद्रीत करावं लागणार
राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करताना अरविंद केजरीवाल यांना छोट्या राज्यांवर भर द्यावा लागणार आहे. पंजाबमध्ये त्यांच्या या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसला आहे. त्यांनी याआधी हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि गोवा या राज्यांमध्ये प्रयत्न करुन माघार घेतली आहे. आता नव्या ताकदीने त्यांना सक्रीय प्रयत्न करावे लागणार आहेत.
अरविंद केजरीवाल यांनी आयआयटीतून आपलं शिक्षण घेतलं. यानंतर भारतीय महसूल सेवेत आयुक्त म्हणून काम केलं. माहिती अधिकार कार्यकर्ते ते अगदी देश पातळीवरील जनलोकपाल आंदोलनाचं नेतृत्व अशा विविध पातळ्यांवर त्यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं आहे. आता सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असताना त्यांची प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे. याचा त्यांना येणाऱ्या काळात राष्ट्रीय राजकारणात जम बसवताना किती फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Arvind Kejriwal and National Politics