मैं शपथ लेता हू, अरविंद केजरीवालांना दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची तिसऱ्यांदा शपथ
अरविंद केजरीवाल यांच्यासोबत उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, कैलाश गहलोत, गोपाल राय, इम्रान हुसैन यांचा शपथविधी झाला.
नवी दिल्ली : व्हीआयपी नेत्यांना आमंत्रण टाळत ‘आम आदमी पक्षा’चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी सामान्य नागरिकांच्या साक्षीने दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली. रविवारी दुपारी बारा वाजून दहा मिनिटांच्या मुहूर्तावर उपराज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवालांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. रामलीला मैदानावर केजरीवालांच्या साथीने सहा कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी सोहळा (Arvind Kejrwal Delhi CM Sworn in) रंगला.
‘आता निवडणूक संपली आहे. केंद्र सरकारसोबत काम करुन दिल्लीला अव्वल दर्जाचं शहर बनवण्याची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद हवा आहे. आम्ही विरोधकांना माफ केलं आहे. सगळ्यांसोबत मिळून काम करण्याची इच्छा आहे’, अशा भावना केजरीवालांनी शपथविधीनंतर व्यक्त केल्या.
अरविंद केजरीवाल यांच्यासोबत उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, कैलाश गहलोत, गोपाल राय, इम्रान हुसैन यांचा शपथविधी झाला. राजधानी दिल्लीच्या जडणघडणीत हातभार लावणारे सामान्य रिक्षाचालक, सफाई कामगार, डॉक्टर, शिक्षक, बाईक अॅम्ब्युलन्स चालक, बस मार्शल, बांधकाम मजूर अशा ‘सुपर 50’चा समावेश आहे. शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रामलीला मैदानावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
Arvind Kejriwal takes oath as Chief Minister of Delhi for a third term pic.twitter.com/cgfhmBEAgl
— ANI (@ANI) February 16, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही केजरीवालांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु वाराणसी दौऱ्यावर असलेल्या मोदींनी या सोहळ्याला हजेरी लावलेली नाही. कोणत्याही राज्यांचे मुख्यमंत्री किंवा दिग्गज राजकीय नेत्यांना शपथविधीला बोलावणार नसल्याचं ‘आप’कडून सांगण्यात आलं होतं.
दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेणारा छोटा मफलरमॅनही केजरीवालांच्या पाहुण्यांच्या यादीत होता. एक वर्षाच्या अव्यान तोमरलाही या सोहळ्याचं खास निमंत्रण होतं.
काँग्रेसच्या दिवंगत नेत्या शीला दीक्षित यांच्यानंतर अरविंद केजरीवालांनीही दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक साधली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने 62 जागा जिंकल्या, तर भाजपला केवळ 8 जागांवर समाधान मानावं लागत आहे. काँग्रेसचा पुरता सुपडासाफ झाला आहे. दिल्लीतील सलग दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. दिल्लीचे निकाल मंगळवार 11 फेब्रुवारीला जाहीर झाले.
अरविंद केजरीवाल यांनी सर्वात आधी 28 डिसेंबर 2013 रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मात्र, 49 दिवसांनंतर 14 फेब्रुवारी 2014 रोजी ‘व्हॅलेंटाईन डे’ला त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 14 फेब्रुवारी 2015 रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ‘व्हॅलेंटाईन डे’शी केजरीवालांचं अनोखं कनेक्शन असल्याने ते पुन्हा याच मुहूर्ताची निवड करतील, असं म्हटलं जात होतं. परंतु अरविंद केजरीवाल यांनी यंदा दोन दिवस उशिराचा दिवस ठरवला. (Arvind Kejrwal Delhi CM Sworn in)