एकदा ‘त्या’ डॉक्टरांची मुलाखत घ्या, व्यथित शिवसेना खासदार अरविंद सावंत काय म्हणाले?
विधानसभा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही राज ठाकरेंचा समाचार घेतला. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे.
मुंबईः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आजारपणाची नक्कल खुद्द राज ठाकरे यांनी केल्याने शिवसेना नेते संतप्त आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत, अरविंद सावंत (Arvind Sawant) तसेच अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी यावर सणकून टीका केली आहे. खासदार अरविंद सावंत अत्यंत व्यथित होऊन प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे हे घरात बसणारे मुख्यमंत्री, ते कधीच बाहेर पडत नव्हते, अशी वारंवार टीका करणं योग्य नाही.. माध्यमांनी एकदा त्या डॉक्टरांची मुलाखत घ्यावी, ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर उपचार केले. त्यानंतरच उभ्या महाराष्ट्राला कळेल, ते किती गंभीर आजारातून बाहेर पडले, असं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलंय.
ते म्हणाले, कोरोना काळात कोणतेही मुख्यमंत्री बाहेर फिरत नव्हते. पंतप्रधानदेखील बाहेर नव्हते. मग उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरून त्यांना का टार्गेट केलं जातंय? उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेल्या प्रयत्नांचं सुप्रीम कोर्टाने, डब्ल्यूएचओनेही कौतुक केलं. पण कुणीही दिलदारपणे हे स्वीकारलं नाही, अशी खंत अरविंद सावंत यांनी व्यक्त केली.
डॉक्टरांची मुलाखत घ्या.. उभ्या महाराष्ट्राला कळू द्या, उद्धव ठाकरे कोणत्या गंभीर आजारातून बाहेर आले. उद्धव ठाकरेंसारखा कनवाळू नेता, कुटुंब प्रमुख कसे आजारपणावर मात करून बाहेर पडले, हे कळलंच पाहिजे, असं अरविंद सावंत म्हणाले.
संजय राऊत यांनीही राज ठाकरेंच्या नकलेवर प्रतिक्रिया दिली. राजकारण म्हणजे मिमिक्री नव्हे. आम्हाला नकला पहायच्या असतील तर आम्ही जॉनी लिव्हरच्या पाहू, असा टोमणाही संजय राऊत यांनी लगावला.
तर विधानसभा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही राज ठाकरेंचा समाचार घेतला. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे.