सचिन अहिर ज्या दोन शिवसैनिकांविरुद्ध लढले, त्या आशिष चेंबूरकर आणि सुनिल शिंदेंची प्रतिक्रिया काय?
वरळी विधानसभा निवडणुकीत सचिन अहिर विरुद्ध सुनिल शिंदे यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी सुनिल शिंदे यांनी बाजी मारली. त्याआधी आशिष चेंबूरकर विरुद्ध सचिन अहिर अशीही लढत झाली होती.

मुंबई : राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी शिवबंधन बांधलं . सकाळी साडेदहाच्या सुमारास सचिन अहिर मातोश्रीकडे रवाना झाले.
सचिन अहिर हे यापूर्वी राष्ट्रवादीकडून वरळी विधानसभा निवडणूक लढवत होते. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अहिर यांचा शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनिल शिंदे यांनी पराभव केला.
वरळी विधानसभा निवडणुकीत सचिन अहिर विरुद्ध सुनिल शिंदे यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी सुनिल शिंदे यांनी बाजी मारली. मात्र 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेकडून पुन्हा आशिष चेंबूरकर यांना तिकीट देण्याची चर्चा होती. कारण 2009 च्या निवडणुकीत आशिष चेंबूरकर यांनी विधानसभा लढत सचिन अहिर यांना कडवी लढत दिली होती. मात्र त्यांचा पराभव झाला.
तेव्हापासून सचिन अहिर विरुद्ध आशिष चेंबूरकर असं चित्र वरळी परिसरात नेहमीच पाहायला मिळतं. सचिन अहिर यांच्याविरोधात लढणारे दोन शिवसैनिक सुनिल शिंदे आणि आशिष चेंबूरकर यांची प्रतिक्रिया टीव्ही 9 मराठीने जाणून घेतली.
अहिर यांच्या प्रवेशाबाबत चेंबूरकरांची प्रतिक्रिया
शिवसेनेचे वरळी विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांनी सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाचं स्वागत केलं आहे. “सचिन अहिर यांच्या पक्ष प्रवेशासाठी शिवसेना पक्षप्रमुखांनी जो निर्णय घेतला, तो आम्हाला मान्य आहे. सचिन अहिर यांना शिवसेनेची विचारधारा पटली, म्हणून ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत”, असं आशिष चेंबूरकर म्हणाले.
सुनिल शिंदे यांची प्रतिक्रिया
सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत शिवसेना आमदार सुनिल शिंदे म्हणाले, “पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य आहे”. वरळीमध्ये आदित्य ठाकरे, सचिन अहिर की सुनिल शिंदे उमेदवार असेल यावर विचारले असता, सुनिल शिंदेंनी वरळीमध्ये शिवसेनेचा उमेदवार धनुष्यबाण असेल असे सांगितले.
सचिन अहिर यांचा शिवसेना प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) भगदाड पडलं आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर (Sachin Ahir) हे शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर सचिन अहिर शिवबंधन बांधलं. उद्धव ठाकरे यांनी अहिर यांचं शिवसेनेत स्वागत केलं.
संबंधित बातम्या
शरद पवार माझ्या हृदयात, त्यांना सांगण्याचं धाडस झालं नाही : सचिन अहिर
आदित्य ठाकरेंसाठी मैदान मोकळं, वरळीतून विधानसभा लढण्याची चिन्हं, सचिन अहिर विधानपरिषदेवर?
राष्ट्रवादीला मोठे खिंडार, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार : सूत्र