EVM विरोधातील पत्रकार परिषदेवरुन आशिष शेलार आणि संदीप देशपांडे यांच्यात घमासान
आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्या या एकमुखी मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पत्रकार परिषदेवरुन शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
मुंबई : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अर्थात EVM विरोधात राज्यातील बड्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन एकजूट दाखवली. आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्या या एकमुखी मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पत्रकार परिषदेवरुन शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. “ज्यांनी कधीही निवडणूक लढवलेली नाही त्यांनी तर ईव्हीएमवर बोलू नये”, अशी टीका शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्यावर उत्तर देताना पत्रकार परिषदेला घाबरणारे पंतप्रधान ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ या साहसी खेळात कसे सहभागी होतात? अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.
माझा आशिष शेलार यांना प्रश्न आहे की, पत्रकार परिषदेला घाबरणारे पंतप्रधान ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ या साहसी खेळात कसे सहभागी होतात? फक्त खोटं बोलणारे पंतप्रधान लोकांच्या विश्वासार्हतेवर कसं काय बोलू शकतात? या प्रश्नांचीही उत्तरे मिळाली पाहिजेत. अशी टीकाही संदीप देशपांडे यांनी केली.
आशिष शेलार यांची प्रतिक्रिया
“ईव्हीएमविरोधात राज्यातील विरोधीपक्षांनी घेतलेली पत्रकार परिषद पाहिली. मात्र ही पत्रकार परिषद घेण्याआधी जे या ईव्हीएमद्वारेच निवडून आले आहेत त्यांनी राजीनामे द्यावेत अशी टीका आशिष शेलार यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर केली. या पत्रकार परिषदेत इतर जे कोणी होते, ज्यांनी कधीही निवडणूक लढवलेली नाही त्यांनी तर ईव्हीएमवर बोलूच नये, असेही आशिष शेलार यांनी सांगितले.
“लोक आता विरोधकांना स्विकारायला तयार नाहीत. त्यांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे, अशी झाली आहे. म्हणूनच, ते ईव्हीएमवर टीका करीत आहेत. त्यांनी आधी आत्मपरिक्षण करावे. भारतीय निवडणूक आयोगाचे जगभरातून कौतुक होत असताना विरोधी पक्ष त्यांच्यावर त्यावर अविश्वास निर्माण करीत आहेत,” असेही आशिष शेलार यावेळी म्हणाले.
EVM विरोधात विरोधकांची एकजूट
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अर्थात ईव्हीएमविरोधात विरोधक एकवटले आहेत. महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. EVM विरोधात मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, राजू शेट्टींचा स्वाभिमानी पक्ष, शेकापसह सर्व विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले.
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अर्थात EVM विरोधात राज्यातील बड्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन एकजूट दाखवली. EVM आणि VVPAT ला हटवा, लोकशाही वाचवा असा नारा देत, बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्या, यासाठी 21 ऑगस्ट रोजी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा दिसणार नाही, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं.
मुंबईतील एमआयजी क्लबमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते बाळासाहेब थोरात, स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील उपस्थित होते.
संबंधित बातम्या :
EVM विरोधात 21 ऑगस्टला मोर्चा, राज ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, राजू शेट्टींची एकत्र घोषणा