उद्धव ठाकरे गप्प का? सुषमा अंधारे, संजय राऊतांच्या वक्तव्यावर भूमिका स्पष्ट करा, भाजपाही आंदोलनाच्या आखाड्यात
संजय राऊत अहंकारात अधोगतीला गेले आहेत. आंबेडकरी जनतेच्या मनात खदखद आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
मुंबईः संजय राऊत (Sanjay Raut) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. Babasaheb Ambedkar) अपमान केलाय. त्यांनी आधी जनतेसमोर माफी मागावी. तसेच सुषमा अंधारे हिंदू देवी-देवतांबद्दल एवढी आक्षेपार्ह वक्तव्ये करतात, त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी का मौन बाळगलंय, त्यांनी नेमकी भूमिका स्पष्ट करावी, असं वक्तव्य भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलंय. सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे. उद्या याच मागणीसाठी भाजप आंदोलन करणार आहे.
मुंबईतील सर्व स्थायी लोकसभा क्षेत्रांत आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी माफी मागो आंदोलन करणार आहेत. काळे झेंडे लावून निषेध व्यक्त करतील, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू धर्माबाबत वक्तव्ये करण्याची हिंमत केली, ती अन्य धर्माच्या बाबतीत केली असती का? उद्धव ठाकरेंची मूक संमती आहे का, असा सवाल आशिष शेलार यांनी केला.
भगवान रामचंद्र, शंकराबद्दल त्यांनी वापरलेली वाक्य गंभीर आहेत. तुम्ही बोलत असाल तर तुमच्या पक्षाच्या प्रमुखांनी उत्तर द्यावं. ते का गप्प आहेत? राज्यपालांनी दिलगिरी व्यक्त केली. केंद्रासमोर भूमिका मांडली.
संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला, यावरून वाद निर्माण केलाय. आमदार भाई दिनकर यांनी त्यांना यासंबंधीचं पुस्तकाही पाठवल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं.
संजय राऊत अज्ञान पाजळायची एकही संधी सोडत नाहीत. डॉ. बाबासाहेबांच्या जन्मस्थळाबद्दल भ्रम पसरवण्यातपर्यंत त्यांची मजल गेली आहे. ज्या काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव केला, त्याच काँग्रेसबरोबर गेल्यावर संजय राऊत असे वक्तव्य करत आहेत, असा आरोप आशिष शेलार यांनी केला.
संजय राऊत अहंकारात अधोगतीला गेले आहेत. आंबेडकरी जनतेच्या मनात खदखद आहे. राऊत यांनी आणखी खोल जाऊ नये, अशी मित्र म्हणून माझी इच्छा आहे, असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला.