Ashish Shelar : मुंबईचा मेट्रोमॅन देवेंद्र फडणवीस; ‘उंदीरही सोडत नाहीत, हे कसले वाघ’, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
महापालिका उंदीर मारण्याचं टेंडर काढते आणि एका एका वार्डात 1 कोटी खर्च केल्याचं सांगते. पण एक उंदीर किंवा पंचनामाही दाखवत नाहीत. हे उंदीरही सोडत नाहीत, हे कसले वाघ? अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर केलीय.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शनिवारी बीकेसीतील सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका केली. त्यानंतर रविवारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही उत्तरसभा घेतली. त्यावेळी भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री कालच्या भाषणात म्हणाले हृदयात राम आणि हाताला काम. पण मुंबईत हाताला काम कुठे आहे? महापालिका उंदीर मारण्याचं टेंडर काढते आणि एका एका वार्डात 1 कोटी खर्च केल्याचं सांगते. पण एक उंदीर किंवा पंचनामाही दाखवत नाहीत. हे उंदीरही सोडत नाहीत, हे कसले वाघ? अशी खोचक टीका आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर केलीय.
‘हनुमान चालिसाचं पठण केलं तर जेल’
आशिष शेलार म्हणाले की, हनुमान चालिसाचं पठण केलं तर जेल आणि औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवतात त्याला काही नाही. तो ओवैसीचा बच्चा या महाराष्ट्रातून एफआयआर दाखल न होता निघून जातो. त्याच मुंबईत हनुमान चालिसा पठण केलं तर तुमच्यावर केसेस होतात. हे कोणतं सरकार आहे. ज्याची दशा आण दिशा काय हे अजून निश्चित झाली नाही. कालच्या भाषणाचं वर्णन काय करावं. मराठीत आम्ही त्याला पुचाट सभा म्हणतो. आता तो शब्दही आता बदलला, थूचाट सभा… महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री सभेला सुरुवात करतात तेव्हा म्हणजे हृदयात राम आणि हाताला काम. मात्र, जैतापूरला विरोध का? नाणारला विरोध का? मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला विरोध का? मुंबईत मेट्रोचं जाळ फडणवीसांनी विणलं, शिवसेनेचा मेट्रोला विरोध का? समृद्धी महामार्गाला सुरुवातीला शिवसेनेचा विरोध का? मुंबईतील आरे कारशेडला, कोस्टल रोडला विरोध का? मग हे कसलं हाताला काम? असा सवाल शेलार यांनी केलाय.
मुंबईचा मेट्रोमॅन देवेंद्र फडणवीस
मुंबईचा मेट्रोमॅन देवेंद्र फडणवीस. मेट्रोला तुम्ही विरोध केलात. दुर्दैवानं बोलावं वाटतं मुंबईकरांच्या राशीत काय लिहिलं? फडणवीस आज मुख्यमंत्री असते तर दीड वर्षापूर्वीच सगळ्या मेट्रो लाईन सुरु झाल्या असत्या. आता केवळ घोषणा आणि पोकळ घोषणा या आधारावर मुंबईचं राजकारण सुरु आहे, अशी टीकाही शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केलीय.
मुंबईत डॉ. अमरापुरकरांचा मृत्यू का झाला?
आम्ही पोलखोल सभा घेतल्या. मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा होती. काश्मीरमध्ये राहुल भटचं काय झालं विचारतात? तुमच्या काय संबंध? मुंबईत डॉ. अमरापुरकरांचा मृत्यू का झाला? मुंबई तुंबल्यामुळे त्यांचा जीव गेला. त्याबाबत तुम्ही का बोलत नाही. कमला मिलमध्ये आग लागली, तिथे मुंबईकर जिवंत जळाले. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. रेस्टॉरंटचा मालक, चालवणारा, अधिकारी जेलमध्ये होते. त्यांना बेल मिळाली नाही. मी मुंबईकरांच्या हत्यारांना सोडणार नाही ही फडणवीसांची भूमिका होती. वर्ष लोटलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि 11 जणांचा जीव घेणारे आज बाहेर आहेत. त्या सर्वांना वाचवणारा मुख्यमंत्र्यांच्या जवळचा माणूस. त्याचं कमला मिलमध्ये ऑफिस आहे. तो रोज मुख्यमंत्र्यांना भेटतो, असा गंभीर आरोपही शेलार यांनी केलाय.
हे उंदरांनाही सोडत नाहीत, हे कसले वाघ?
पोलखोल सभेचं काम आमचे अमित साटम पाहत आहेत. त्यांचा प्रश्न आहे की 3 लाख कोटीची कंत्राटं मुंबईच्या स्थायी समितीतून मंजूर झाली त्याचा हिशेब आम्हाला द्या. जे हिशेब देऊ शकत नाहीत ते आज जनतेला विचलीत करत आहेत. भ्रम निर्माण करत आहेत. नाल्यात पैसे खाल्ले, रस्त्यात, कचऱ्यात, पेग्विनमध्ये पैसे खाल्ले. मुंबई महापालिकेला प्रश्न विचारला बाहेर रस्त्यावर, झोपड्यांमध्ये फुटपाथवर झोपलेल्या माणसांना उंदरांचा त्रास होतो. आम्ही विचारलं एका महिन्यात एका वॉर्डात किती उंदीर मारले? ते म्हणतात 10 हजार उंदीर मारले आणि त्यासाठी एक कोटी खर्च केले? आम्ही म्हटलं उंदीर कुठे मारले आणि कुठे ठेवले? त्यांनी जमिनीत पुरल्याचं सांगितलं. ते म्हणाले त्यावर झाडं लावली आणि महापुरात वाहून गेली. मग ती जागा आणि पंचनामातरी दाखवा. त्यांनी उत्तर दिलं वॉर्ड ऑफिसमध्ये पावसामुळे कागद खराब झाले… हे उंदरांनाही सोडत नाहीत, हे कसले वाघ, असा हल्लाबोल शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर केला.