Ashish Shelar : उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच; आशिष शेलार यांचा दावा
Ashish Shelar : उद्धव ठाकरेंची शिवसेना जेव्हा आमच्यासोबत होती. तेव्हाही आम्हाला इशारे देतच होते. मुख्यमंत्री झाल्यावरही आम्हाला इशारे देण्यात आले. आता एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले तरी इशारे देणे सुरूच आहे, असं सांगतानाच उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्वच मुळी आमच्यामुळे आहे.
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी मुलाखत प्रसिद्ध झाली असून या मुलाखतीचे आता पडसाद उमटू लागले आहेत. या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपर (bjp) टीका केली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांना ठाकरेंची ही टीका चांगलीच झोंबली आहे. त्यामुळे सकाळपासून शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे नेते आशिष शेलार (ashish shelar) यांनीही या मुलाखतीवरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ही टीका करत असतानाच उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्वच मुळी भाजपमुळे असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या शिवाय उद्धव ठाकरे यांची मुलाखत म्हणजे रुदालीचा कार्यक्रम होता. मुलाखतीपेक्षा टीझर तरी बरा होता. संपूर्ण मुलाखत स्वत:च्या मनाला उभारी देण्यासाठी होती. गर्भगळीत अशी ही मुलाखत होती, अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
आशिष शेलार मीडियाशी बोलत होते. या मुलाखतीतून केवळ भाजपला इशारे देण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना जेव्हा आमच्यासोबत होती. तेव्हाही आम्हाला इशारे देतच होते. मुख्यमंत्री झाल्यावरही आम्हाला इशारे देण्यात आले. आता एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले तरी इशारे देणे सुरूच आहे, असं सांगतानाच उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्वच मुळी आमच्यामुळे आहे. तुम्ही आमदारांना पालापाचोळा म्हणत असाल तर हा महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. हा महाराष्ट्र द्रोह नाही का? आता यावर सुप्रियाताई सुळे बोलणार आहेत की नाही? असा सवाल आशिष शेलार यांनी केला.
तर तुम्ही काय केले असते?
तुम्ही सत्तेवर असातना जसे वागलात तसे आम्ही वागणार नाही. आज तुम्ही मुख्यमंत्र्यांचा जो उल्लेख केला. तोच उल्लेख तुम्ही मुख्यमंत्री असताना कोणी केला असता तर तुम्ही काय केले असते? जे कोणी तुमचे लवंडे आहेत त्यांनी काय केले असते?, असा सवाल त्यांनी केला.
आम्ही कटकारस्थान केलं नाही
तुम्ही मुख्यमंत्री असताना ममता बॅनर्जींना भेटत होता. केसी राव यांना भेटत होता. सोनिया गांधी यांच्याशी बोलत होता. या लोकांशी तुम्ही काय बोलत होता? आण्ही जेव्हा शब्द देतो तेव्हा तो पाळत असतो. कटकारस्थान करत नाही, असा पलटवारही त्यांनी केला.
मित्र पक्षांना फोडण्याचा प्रयत्न कुणाचा?
तुम्ही 2014मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर तुम्ही 2014मध्ये युती तोडली. आम्ही कधीही त्याबाबत जाहीर वाच्यता केली नाही. या घटनेचा मी साक्षीदार आहे. एकीककडे युतीची बोलणी करायची आणि दुसरीकडे ग्रामीण भागातील भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत घ्यायचे असा कार्यक्रम सुरू होता. राजू शेट्टी आणि रामदास आठवले हे आमचे मित्र पक्ष आहेत. त्यांना आम्ही जोडलं. त्यांनाही आपल्याकडे खेचण्याचा कोण प्रयत्न करत होते? असा सवालही त्यांनी केला.