सोनिया गांधींकडे थोरातांची तक्रार केल्याचा आरोप, अशोक चव्हाण म्हणतात…
दिल्ली विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्र काँग्रेसमधील खदखदही बाहेर पडत असल्याची चर्चा आहे
मुंबई : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी वाईट कामगिरी केल्याचा आरोप करणारं पत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लिहिल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र ही बातमी धादांत खोटी आणि खोडसाळ असल्याचं चव्हाणांनी ट्विटरवरुन स्पष्ट केलं (Ashok Chavan Letter to Sonia Gandhi) आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्र काँग्रेसमधील खदखदही बाहेर पडत असल्याची चर्चा होती. याआधी महाविकास आघाडीमध्ये धुसफूस असल्याच्या वावड्या उठत असतानाच, आता काँग्रेस पक्षाला अंतर्गत कलहाचं ग्रहण लागल्याचं बोललं जात होतं. पत्रात अशोक चव्हाणांनी थेट प्रदेशाध्यक्षपदाची मागणी केल्याचा दावा केला जात होता.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची तक्रार करणारं पत्र थेट काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांना लिहिल्याची काँग्रेसमध्ये चर्चा होती.
हेही वाचा – थोरातांना मंदी कळते का? ती एका देशातून दुसरीकडे जात नाही : चंद्रकांत पाटील
‘महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरातांमुळे काँग्रेसची कामगिरी न समाधानकारक राहिली नाही. पक्षाच्या या परिस्थितीला थोरात जबाबदार असून त्यांना पदावरुन हटवावं आणि मला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी द्यावी’ अशी मागणी अशोक चव्हाणांनी केल्याचा दावा एका हिंदी वृत्तवाहिनीने केला होता.
लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनाही खासदारकी गमवावी लागली होती. त्यानंतर पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
दरम्यान, ‘काँग्रेस अध्यक्षा माननीय सोनियाजी गांधी यांना मी एक पत्र लिहिल्यासंदर्भातील बातमी धादांत खोटी, खोडसाळ आणि जाणीवपूर्वक बदनामी करणारी आहे. मी असे कोणतेही पत्र लिहिलेले नाही. क़ृपया संबंधितांनी याची नोंद घ्यावी.’ असं ट्वीट अशोक चव्हाणांनी केलं आहे.
काँग्रेस अध्यक्षा माननीय सोनियाजी गांधी यांना मी एक पत्र लिहिल्यासंदर्भातील बातमी धादांत खोटी, खोडसाळ आणि जाणीवपूर्वक बदनामी करणारी आहे. मी असे कोणतेही पत्र लिहिलेले नाही. क़ृपया संबंधितांनी याची नोंद घ्यावी.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 13, 2020
Ashok Chavan Letter to Sonia Gandhi