मुंबई: मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी “घटनापीठ स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे सरन्यायाधिशांनी आज सर्वोच्च न्यायालयात सांगितले. मराठा आरक्षण प्रकरणी शासनाचे वकील व ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांच्या यासंदर्भातील विनंतीनंतर सरन्यायाधिशांनी हे सूतोवाच केले”, असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. (Ashok Chavan gave information that Chief Justice of India is Positive for Constitution Bench to hearing Maratha Reservation case)
राज्य सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे स्थगिती मिळाली आहे. या स्थगितीमुळे नोकरभरती व शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या अर्जावर घटनापीठासमोर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती मुकूल रोहतगी यांनी आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांना केली असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
#मराठाआरक्षण बाबत घटनापीठ स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे सरन्यायाधिशांनी आज सर्वोच्च न्यायालयात सांगितले. मराठा आरक्षण प्रकरणी शासनाचे वकील व ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांच्या यासंदर्भातील विनंतीनंतर सरन्यायाधिशांनी हे सूतोवाच केले.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) November 2, 2020
राज्य शासनाने यापूर्वी दोन वेळा म्हणजे ७ ऑक्टोबर आणि २८ ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण बाबत घटनापीठ स्थापन करण्याच्या मागणीचा लेखी अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. याच मागणीचा तिसरा लेखी अर्ज आज दाखल करण्यात आला.
मराठा आरक्षणावर 28 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. या सुनावणीत मराठा आरक्षणाला स्थगिती देणारे न्यायमुर्ती एल.एन.राव यांच्यासमोर युक्तिवाद करण्यात आला. न्या. एल.एन. राव यांनी मराठा आरक्षणाची सुनावणी 4 आठवडे तहकूब केली होती. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर घटनापीठाकडे जायचे असल्यास जाऊ शकता आम्ही फक्त सुनावणी तहकूब करतो, असं म्हटलं होतं.
अशोक चव्हाण यांनी परभणी येथील एमआयडीसी भागातील व्यंकटेश मंगल कार्यालयात काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केंद्र सरकारच्या मराठा आरक्षणाबद्दलच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. या देशात कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही? मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटण्यासाठी दिल्लीतील नेत्यांनी सकारात्मकता दाखवली पाहिजे, अशी आशा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली होती.
संबंधित बातम्या :
राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा का नाही?; अशोक चव्हाणांचा थेट सवाल
मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, पंढरपूर ते मुंबई पायी मोर्चा काढणार
(Ashok Chavan gave information that Chief Justice of India is Positive for Constitution Bench to hearing Maratha Reservation case)