कुठल्या घोड्यावर बसल्यावर फायदा होईल, ते ठरवावं, पंकजा मुंडेंना कुणी दिला सल्ला?

| Updated on: Jan 14, 2023 | 9:36 AM

महाराष्ट्रातील राजकारणापासून दूर असल्याने पंकजा मुंडे यांचं राजकीय करिअर संपुष्टात येईल की काय अशी चर्चा आहे. त्यामुळेच आतापर्यंत विविध पक्षांनी त्यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.

कुठल्या घोड्यावर बसल्यावर फायदा होईल, ते ठरवावं, पंकजा मुंडेंना कुणी दिला सल्ला?
Image Credit source: social media
Follow us on

राजीव गिरी, नांदेडः पंकजा मुंडे (Pankaja Munde) या कर्तृत्ववान नेत्या आहेत. त्यांना उत्तम राजकीय जाण आहे. त्यामुळे कोणत्या घोड्यावर बसल्यावर जास्त फायदा आहे, हे त्यांनी ठरवायचं आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या (Congress) बड्या नेत्याने दिली आहे. पंकजा मुंडे यांच्यावर भाजपात वारंवार अन्याय होतोय. आगामी निवडणुकांपूर्वी त्यांनी योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या एका आमदाराने त्यांनी शिवसेनेत यावं अशी विनंती केली आहे. यावरून अनेक राजकीय वावड्या उठत आहेत. यावरून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी ही प्रतिक्रिया दिली.

नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं. ते म्हणाले, ‘ गेल्या अनेक वर्षांपासून पंकजा मुंडे यांचं काम मी पाहतोय. सभागृहात त्या प्रभावीपणे काम करतात. त्यांना उत्तम जाण आहे. त्यांना काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे.

त्यांनी कोणत्या पक्षात जावं, यावर मी भाष्य करण्याची गरज नाही. कुठल्या घोड्यावर बसल्यामुळे फायदा होऊ शकतो, हे त्यांनी ठरवायचंय, असं अशोक चव्हाण म्हणाले.

पंकजा मुंडे नाराज का?

गेल्या काही दिवसांपासून भाजपातील अंतर्गत निर्णयांनुसार, पंकजा मुंडे मुख्य प्रवाहातून बाजूला झाल्याचे चित्र आहे. पक्षातर्फे केली जाणारी महत्त्वाची आंदोलनांमधून पंकजा मुंडेंची गैरहजेरी. तसेच मराठवाड्यातील मोठ्या कार्यक्रमांनाही त्यांना निमंत्रण न देणं असे प्रकार दिसून येत आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या मेहनतीमुळे महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात भाजपाचा विस्तार झाला. मात्र त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना गेल्या काही वर्षांपासून राजकीय संघर्षाला सामोरं जावं लागतंय.

पक्षाच्या विविध मेळाव्यांमध्ये खुद्द पंकजा मुंडे यांनीदेखील हे मान्य केलं आहे. मात्र या संघर्षासाठी आपली तयारी आहे, रडणार नाही तर लढणार आहोत, असा बाणा पंकजा मुंडे यांनी दर्शवला होता.

कुणा-कुणाकडून ऑफर?

महाराष्ट्रातील राजकारणापासून दूर असल्याने पंकजा मुंडे यांचं राजकीय करिअर संपुष्टात येईल की काय अशी चर्चा आहे. त्यामुळेच आतापर्यंत विविध पक्षांनी त्यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांनीदेखील नुकतीच त्यांना ऑफर दिली होती. ओबीसी समाजाचे नेतृत्व करत पंकजाताईंनी वेगळा निर्णय घेतला तर मुस्लिम समाज तुमच्या पाठिशी उभा असेल, असं वक्तव्य खा. जलील यांनी केलं होतं.

तर ठाकरे गटाचे आमदार सुनिल शिंदे यांनीही पंकजा मुंडे आवाहन केलं होतं. त्यांच्या कर्तृत्वाची नेहमीच आम्हाला कदर असेल. त्यांना शिवसेनेत यायचं असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.