अशोक चव्हाणांचा राजीनामा मंजूर होणार, महाराष्ट्रात ओबीसी चेहऱ्याला संधी?
काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते. महाराष्ट्रात काँग्रेस अशोक चव्हाणांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते. महाराष्ट्रात काँग्रेस अशोक चव्हाणांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
येत्या तीन महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यातील नेत्यांची दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर अशोक चव्हाण यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता. त्यांच्यासह काँग्रेसच्या इतर प्रदेशाध्यक्षांनीही राजीनामे दिले होते. पण अशोक चव्हाण यांचा राजीनामा अजून स्वीकारण्यात आला नव्हता.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अध्यक्षांपासून ते प्रदेशाध्यक्षांपर्यंत दिग्गजांचा पराभव झाला होता. राहुल गांधींनीही राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर होण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांचा नांदेडमधून पराभव झाला होता. शिवाय काँग्रेसला राज्यात केवळ एक जागा मिळवता आली. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने नांदेड आणि हिंगोली या जागा जिंकल्या होत्या, त्या जागा राखण्यातही काँग्रेसला अपयश आलं.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उभारी घेणं हेच काँग्रेससमोर आव्हान आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद हे विजय वडेट्टीवार यांना देण्यात आलं. विजय वडेट्टीवार हे ओबीसी चेहरा आहेत. पण राज्यातील निवडणूक नेतृत्त्वात लढता येईल, अशा चेहऱ्याचा काँग्रेसला शोध आहे.
विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांचीही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागू शकते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राहुल गांधींनी संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी मुक्काम केला होता. शिवाय दुसऱ्या दिवशी दोघांचा फोटोही स्वतःच शेअर केला होता. त्यामुळे काँग्रेस राज्यातलं नेतृत्त्व कुणाकडे देतं याकडे लक्ष लागलंय.