“तेव्हा फडणवीसांच्या मनाला वेदना झाल्या नाहीत का?” अशोक चव्हाणांचा तिरकस सवाल
कोरोनामुळे भरती प्रक्रिया थांबवली आहे. हा जीआर काल काढलेला नाही, 4 मे रोजी काढला आहे, असे चव्हाणांनी स्पष्ट केले.
मुंबई : “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने मेगाभरती करणार नाही, अशी भूमिका मांडली, तेव्हा त्यांच्या मनाला वेदना झाल्या नाहीत का? तेव्हा तर कोरोना नव्हता” असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी विचारला. फडणवीसांनी मेगाभरतीवरुन केलेल्या टीकेला चव्हाणांनी उत्तर दिले. (Ashok Chavan taunts Devendra Fadnavis over his comment on recruitment process)
“विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल चुकीचं विधान केलं. सरकारने नोकरभरती बंद करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. आम्ही कोरोनामुळे भरती प्रक्रिया थांबवली आहे. हा जीआर काल काढलेला नाही, 4 मे रोजी काढला आहे” असे चव्हाणांनी स्पष्ट केले.
“देवेंद्र फडणवीस यांनी काल बोलताना, 15 सप्टेंबर 2020 पर्यंत भरती न करण्याची राज्य सरकारची भूमिका मनाला वेदना देणारी असल्याचे म्हटले होते. परंतु डिसेंबर 2018 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने आम्ही मेगाभरती करणार नाही, अशी भूमिका मांडली तेव्हा त्यांच्या मनाला वेदना झाल्या नाहीत का? तेव्हा तर कोरोना नव्हता” असा सवाल अशोक चव्हाण यांनी विचारला.
“मराठा आरक्षणाबाबत पूर्ण तयारी”
मराठा आरक्षण प्रकरणी प्रत्यक्ष सुनावणी व्हायला हवी, अशी राज्य सरकारचीही भूमिका आहे. सरकारचे वकील मुकुल रोहतगी यांनी याबाबत भूमिका न्यायालयात मांडली आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगित देण्यास नकार दिला आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.
“कागदपत्रे पोहचली नाहीत असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. मात्र सरकारची तयारी पूर्ण आहे, सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. व्हर्च्युअल सुनावणीत प्रत्यक्ष कागद कसे पुरवणार? चंद्रकांत पाटील यांना एवढी तळमळ असेल, तर केंद्र सरकारने यात हस्तक्षेप अर्ज देऊन खटल्यात मदत करावी” असेही चव्हाण म्हणाले.
हेही वाचा : राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत येण्यास तयार : चंद्रकांत पाटील
“काही नेत्यांकडून याविषयी विपर्यास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. चुकीची विधाने करुन, सोशल मीडियावर चुकीची माहिती देऊन मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. सरकारची तयारी काय चालली आहे ते सरकार सांगत नाही, असं मेटे म्हणतात. पण न्यायालयीन प्रक्रियेत सर्व बाबी उघड करायच्या नसतात, रणनीती जाहीर करायची नसते” असे उत्तर अशोक चव्हाण यांनी दिले.
“मुख्यमंत्री भाजपसोबत जाण्याच्या मनस्थितीत नाहीत”
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याची तयारी असल्याचं वक्तव्य केलं होतं, त्यावरही अशोक चव्हाण यांनी भाष्य केलं. “आमची उद्धव ठाकरेंशी वेळोवेळी चर्चा झाली आहे. खाजगी बैठकीतही मुख्यमंत्र्यांनी आपण भाजपबरोबर जाण्याच्या मनस्थिती नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अशी सूतराम शक्यता नाही” असे चव्हाण म्हणाले. “विरोधकांना स्वप्न पडत आहेत, आज त्यांचं सरकार येईल, उद्या त्यांचं सरकार येईल, ते आपल्या लोकांना झुलवण्याचा प्रयत्न करत आहेत” असा टोलाही अशोक चव्हाणांनी लगावला.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
“देशात आतापर्यंत राम मंदिर आणि बाबरी मशिद यावर राजकारण झालं आहे. ज्यांना जायचं आहे त्यांना निमंत्रण दिलं पाहिजे” असे चव्हाण म्हणाले.
“जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा विभागांचं वाटप झालं. त्यात ओबीसी विभाग काँग्रेसकडे आहे. ‘सारथी’ ओबीसी विभागांतर्गत येतो. त्यामुळे हा विभाग कुणाकडे द्यायचा असेल, तर तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. राज्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री आहेत आणि बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते आहेत. थोरात याबाबत ठरवतील निर्णय मुख्यमंत्री घेतील.” असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
संबंधित बातमी:
तीन पक्षांचे चार दिग्गज, दीड तास चर्चा, ‘वर्षा’वर खलबतं, अखेर अशोक चव्हाणांची नाराजी दूर
(Ashok Chavan taunts Devendra Fadnavis over his comment on recruitment process)