काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीवरून राजस्थानात मोठ्या हालचाली सुरू आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 26 सप्टेंबरला अशोक गहलोत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. अशोक गहलोत यांनी आज रात्री आमदारांची बैठक बोलावल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री निवासस्थानी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या स्वागतानिमित्त भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर काँग्रेसच्या आमदारांची बैठक होईल. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे बुधवारी दिल्लीत कार्यक्रमांना जाणार आहेत. दिल्लीत ते काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.
अशोक गहलोत यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ते राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांना नकार दिला. सर्वांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राहुल गांधी समोर यावेत, असं वाटतं. पण, राहुल गांधी यांना यासाठी मनविण्यात अद्याप यश आलं नाही. त्यामुळं राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, हे अद्याप स्पष्ट नाही.
मुख्यमंत्री अशोक गहलोत राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. अशोक गहलोत राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यास राजस्थानचे नवे मुख्यमंत्री कोण होणार?
गहलोत यांनी आपल्या मर्जीतील व्यक्ती मुख्यमंत्री पदी दिल्यास सचिन पायलट पुन्हा नाराज होऊ शकतात. कारण अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात अंतर्गत मतभेद आहेत.
राहुल गांधी पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष होण्यास तयार नाहीत. राहुल यांना मनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्ष होण्यास स्पष्टपणे नकार दिलाय.
सर्व प्रदेश समित्यांच्या प्रस्तावानंतरही राहुल गांधी अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यामुळं सर्व काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आता कोण अध्यक्ष होणार याची चर्चा सुरू आहे.
राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान मध्यंतरी दिल्लीत परत येण्याची शक्यता कमी आहे.भारत जोडो यात्रा पूर्ण केल्यानंतर ते परत येतील.
काँग्रेस अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे. अशावेळी राहुल गांधी उपस्थित नसल्यास आणखी काही नेते अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.