मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष अंतिम टप्प्यात आलाय. एकीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी बहुमत चाचणीसाठी उद्याची तारीख दिलीय. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद सुरु आहे. तर दुसरीकडे राज्यात राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मंत्रालयात उपस्थित आहेत. ही मंत्रिमंडळ बैठक वादळी होण्याची शक्यता सुरुवातीपासूनच व्यक्त केली जातेय. कारण शिवसेनेकडून औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव या बैठकीत ठेवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक सुरु झाली असतानाच अवघ्या दोन मिनिटात काँग्रेसचे दोन मंत्री बैठकीतून बाहेर पडले आहे. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आणि अस्लम शेख हे मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पडल्यानं चर्चेला उधाण आलं. वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख बैठकीतून का निघून गेले, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, काँग्रेसच्या दोन मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीतून घेतलेली एक्झिट म्हणजे सरकारच्या आशा मावळल्या आहेत का? असा सवालही विचारला गेला. मात्र, आपल्या विभागाच्या फाईल घेऊन वर्षा गायकवाड पुन्हा मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी झाल्या.
CM #UddhavThackeray reaches #Mantralaya for the meeting of the state cabinet. DCM #AjitPawar & minister Chhagan Bhujbal who are Covid positive, are participating via VC#ShivSena #Maharashtra #MaharashtraPoliticalCrisis #MahaVikasAghadi #EknathShinde pic.twitter.com/6gRRhw0Z9n
— Dhaval Kulkarni (धवल कुलकर्णी) ?? (@dhavalkulkarni) June 29, 2022
शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी कालच शिवसेनेकडून तीन महत्वाचे प्रस्ताव उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करा अशी शिवसेनेची मागणी आहे. मात्र, मागील अडीच वर्षापासून सत्तेत असूनही शिवसेनेकडून याबाबत कुठलीही हालचाल झाली नव्हती. मात्र, आता शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शिवसेनेनं हे दोन महत्वाचे प्रस्ताव सादर केले असण्याची शक्यता आहे. तसंच नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचाही एक प्रस्ताव शिवसेनेकडून मांडला जाण्याची शक्यता होती. मात्र, औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला काँग्रेस जोरदार विरोध करण्याची शक्यता वर्तवली जात होती.
त्यामुळे शिवसेनेकडून औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव सादर करण्यात आला आणि त्याला काँग्रेसनं विरोध केला असण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्याच मुद्द्यावरुन वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख हे मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पडले असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, काही फाईल घेण्यासाठी आपण कार्यालयात गेलो होतो असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आणि त्या पुन्हा एकदा मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी झाल्या.