तर त्याच्या कानफटात लगावणार; मंत्री गुलाबराव पाटील संतापले
जळगावातील धरणगाव तालुक्यातील विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर प्रचंड टीका केली आहे. तसेच गावातील घरकुल योजनेतील भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही फैलावर घेतले आहे,
जळगाव | 9 फेब्रुवारी 2024 : जळगावातील धरणगाव तालुक्यातील हनुमंत खेडा येथे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान भाषण करतांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका गावात घरकुलाचे पैसे खाणाऱ्या बीडीओबद्दल ( गट विकास अधिकारी ) बोलताना चांगलाच संताप व्यक्त केला आहे. जो माणूस घरकुलमध्ये आडवा येणार त्याचे कानफाड मी फोडणार असे गुलाबराव पाटील यांनी आवेशात म्हटले आहे.
धरणगाव तालुक्यातील हनुमंत खेडा येथील कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विकास कामांचे भूमीपूजनाचा कार्यक्रम सुरु असताना भाषण करताना पाटील संतापले. ते पुढे म्हणाले की एका गावातील घरकुलाचे पैसे खाणाऱ्या हरामखोर बीडीओला मी बघणार आहे, सोडणार नाही. त्या व्हिडिओला गरीबी काय आहे हे माहीत नसल्यामुळे त्याला त्याच झोपडीत कोंडलं पाहिजे. अशांच्या कानफटात मारले पाहिजे, तेव्हा त्याला गरिबी कळेल या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
कोण म्हणते वरती भरावे लागते…
गुलाबराव देवकर मंत्री असताना त्यांनी कोणती विकास कामे केली आहेत हे त्यांनी सांगावे असे आव्हान मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी भाषण करताना केले. समाजाचे म्हणून मतं मागता तर समाजाचे कोणती कामे केली आहेत हे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी जाहीर करावे असेही आव्हान यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. निवडणूक आली की सामाजिक वातावरण निर्माण करायचे आणि मजुर फेडरेशनमध्ये कमिशन घ्यायचे. वारे वा बहाद्दर…भानगडी केल्या की आपला सत्यानाश होतो हे निश्चित आहे. कोण म्हणते वरती भरावे लागते. ते इथेच खालीच भरावे लागते असेही यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी
तिच माझी कमाई आहे
काही सांगता, गुलाबराव पाटील रात्री दारू पितो असा आरोप करता. पण माझी मुलं कशी आहेत हे सर्वांना माहीती आहे. एक पण सुपारी खात नाहीत असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना लगावला. तिच माझी कमाई आहे, मी रात्री ठिकाणावर नसलो तरी संध्याकाळी माझी पोरं ठिकाणावर असतात अशा शब्दात त्यांनी माजी पालक मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर टीका केली.