राहुल गांधी यांची स्तुती म्हणजे लाचारी; भाजप आमदाराची उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका
उद्धव ठाकरे मोदी द्वेषाने पछाडलेले आहेत. पक्ष गेले, चिन्ह गेले. जवळची लोक गेली तरी ते बडबड करत आहेत. भाजपच्या मनात शक्तीचा विश्वास नसता तर हे 2019 ला आमच्यासोबत कसे आले असते?
मुंबई | 27 जुलै 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची स्तुती केली आहे. राहुल गांधी यांच्याबाबत माझ्याकडे अनेक गैरसमज पसरवण्यात आले होते. पण जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा आश्चर्य वाटलं. जितकं मला सांगितलं होतं, त्यापेक्षा ते कितीतरी वेगळे आहेत, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे. उद्धव ठाकरे यांनी अचानक राहुल गांधी यांची स्तुती केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यावरून राजकीय तर्कवितर्कही लढवले जात आहेत. ही चर्चा सुरू असतानाच भाजपच्या एका आमदाराने उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे राहुल गांधी यांची स्तुती करतात म्हणजे लाचारी करतात. उद्धव ठाकरे हे काम टाळणारे घरी बसलेले मुख्यमंत्री होते. बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व उद्धव ठाकरे यांनी सोडलं, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. निवडणुका घ्या म्हणता. तुम्ही कोर्टात दाखल केलेली पिटीशन का परत घेत नाही? तुमच्यामुळे निवडणुका रखडल्या. उद्धव ठाकरे यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे, असा हल्ला भातखळकर यांनी चढवला.
परिषदेच्या राजीनाम्याचं काय झालं?
उद्धव ठाकरे मोदी द्वेषाने पछाडलेले आहेत. पक्ष गेले, चिन्ह गेले. जवळची लोक गेली तरी ते बडबड करत आहेत. भाजपच्या मनात शक्तीचा विश्वास नसता तर हे 2019 ला आमच्यासोबत कसे आले असते? मोदींचा फोटो लावून हे निवडून आलेत. 2014 आणि 2019 ला हे मोदींचा फोटो लावून निवडून आलेत. उद्धव ठाकरे हे खोटं बोलत आहेत. उद्धव ठाकरे तुम्ही स्वतः आधी निवडून या. परिषदेचा राजीनामा देणार होता त्याचे काय झालं? असा सवाल त्यांनी केला.
योग्यता ओळखून बोला
उद्धव ठाकरे यांनी आपली योग्यता ओळखून शाखा प्रमुख पातळीवर बोलावं. उद्धव ठाकरे आणि शिल्लक सेनेची वाजवून झालेली जुनी तबकडी आहे. मुंबई राज्यापासून तोडण्याचा कुणाचाही प्रयत्न नाही हे शरद पवार म्हणाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपली कॅसेट बदलावी, असं सांगतानाच मुंबईतील भ्रष्टाचाराचे काय? याचे उत्तर मुंबईतली जनतेला द्या, असं आव्हानच त्यांनी दिलं.
तो अधिकार राज्यपालांचा
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्दयावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमदार नियुक्तीचे अंतिम अधिकार राज्यपालांना असतात. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. त्यानंतर राज्यपाल निवड करतील. त्यामुळे यावर आता बोलणे योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.