शरद पवारांची जुनीच तबकडी, पवारांच्या पक्षाचं चारित्र्य काय? भातखळकरांचं पवारांना प्रत्युत्तर; राऊतांवरही निशाणा
शरद पवार यांची ही जुनीच तबकडी आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचं समर्थन करणं आणि त्यांना मंत्रीपदावर ठेवणं, यावरुन शरद पवार यांच्या पक्षाचं चारित्र्य काय हे लक्षात येतं, अशी खोचक टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलीय.
मुंबई : राज्यातील सत्तांतर आणि देशमुख, मलिक आणि राऊतांवरील कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. जिथं नव्हती तिथं आणली गेली. महाराष्ट्रातही भाजपची हुकुमत नव्हती, पण शिवसेनेचे आमदार (Shivsena MLA) गेल्यानं भाजपची हुकुमत आल्याची खोचक टीका पवार यांनी केलीय. पवारांच्या या टीकेला आता भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी प्रत्युत्तर दिलंय. शरद पवार यांची ही जुनीच तबकडी आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचं समर्थन करणं आणि त्यांना मंत्रीपदावर ठेवणं, यावरुन शरद पवार यांच्या पक्षाचं चारित्र्य काय हे लक्षात येतं, अशी खोचक टीका भातखळकर यांनी केलीय.
‘चला या निमित्ताने शरद पवार यांना कंठ फुटला’
भातखळकर म्हणाले की, संजय राऊत यांच्या अटकेला एक महिना होत आहे. चला या निमित्ताने शरद पवार यांना कंठ फुटला. संजय राऊत यांच्या लिखाणामुळे आम्ही विरोधात काही केलं, यापेक्षा जे पुरावे त्यांच्याविरोधात आहेत, त्याबाबत शरद पवार यांना काही भान आहे की नाही? संजय राऊत यांचं समर्थन केल्याशिवाय पर्याय नाही. कारण, एकमेकांना सांभाळू आणि दोघे मिळून खाऊ, असं सुरु आहे. शरद पवार लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशात आमचं सरकार नाही. पंजाबमध्ये आम्ही सरकार आणलं का? शरद पवार हताश झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या खेळीमुळे ते चेकमेट झालेत. त्यांच्या पक्षाचा भ्रष्टाचार आता उघडकीस आलाय, अशा शब्दात भातखळकर यांनी पवारांवर निशाणा साधलाय.
‘राज ठाकरे यांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न’
राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना भातखळकर म्हणाले की, राज ठाकरे यांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. ते हिंदुत्व आणि मराठीची मुद्दा उचलत आहेत. त्यांना त्यांच्या आजोबांच्या आणि बाळासाहेबांच्या विचारांचा राजकीय वारसा आहे. तो वारसा ते समर्थपणे पुढे घेऊन जात आहेत. तर नुपूर शर्मा यांचं समर्थन कुणी करावं किंवा करु नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. भाजपनं आपली भूमिका घेतली असल्याचं भातखळकरांनी सांगितलं.
येणाऱ्या अधिवेशनात याबाबत खासगी विधेयक आणणार
तसंच देशातील अनेक राज्यांनी धर्मांतर विरोधी विधेयक आणलं आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत खासगी विधेयक आणणार. जबरदस्तीने कुणाचंही धर्मांतर होऊ नये ही त्यामागची भूमिका असल्याचंही भातखळकर यावेळी म्हणाले.