सत्ता होती तेव्हा झोपा अन् आता बांधावर… आदित्य ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स पाहिले का?
श्रीकांत शिंदे, आदित्य ठाकरे दौऱ्यासाठी सिल्लोडमध्ये 500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
दत्ता कनवटे, औरंगाबादः राज्यात सत्ता होती तेव्हा झोपा काढत होते आणि सत्ता गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या भेटी-गाठी घेताहेत, अशा आशयाचे बॅनर्स सध्या औरंगाबादेत चर्चेचा विषय ठरलेत. आदित्य ठाकरेंना डिवचणारे हे बॅनर्स शिंदे गटातर्फे लावण्यात आले आहेत. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आज औरंगाबादकडे लागलंय. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा सिल्लोडमध्ये दौरा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांची सिल्लोडमध्ये (Sillod) जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. तर सिल्लोडमधील शेतकऱ्यांच्या बांधावर आदित्य ठाकरे पोहोचणार आहेत.
दोघांच्याही दौऱ्याची वेळ साधारण एकच आहे. दुपारी चार वाजता हे दोन्ही नेते काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. श्रीकांत शिंदे यांच्या सभेसाठी शिंदे गटाच्या नेत्यांकडून जंगी तयारी करण्यात आली आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना आव्हान दिल्यानंतर त्यांची सिल्लोडमध्ये सभा आयोजित करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ऐनवेळी श्रीकांत शिंदेंची सभा आयोजित केल्याने आदित्य ठाकरेंची सभा रद्द झाल्याचा आरोप शिंदे गटातर्फे करण्यात आला.
आदित्य ठाकरे हे रणछोडदास असल्याची टीका शिंदे गटातर्फे करण्यात आली होती. तर औरंगाबाद शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी हे आरोप फेटाळून लावले. आदित्य ठाकरेंची सभा ठरलीच नव्हती. ते फक्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करणार होते, असं वक्तव्य खैरे यांनी केलं.
राज्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मात्र या घटनाबाह्य सरकारने काहीच केलेलं नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी घेतलेल्या सभांमधून केला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री फक्त कार्यक्रम घेण्यात मग्न आहेत, मात्र सामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांना वेळ नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
श्रीकांत शिंदे, आदित्य ठाकरे दौऱ्यासाठी सिल्लोडमध्ये 500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. 5 डीवायएसपी, 50 पोलीस अधिकारी आणि एसआरपीएफच्या एका तुकडीसह 450 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.