Aurangabad | औरंगाबादेत भाजपच्या हरिभाऊ बागडेंना धक्का, विविध सहकारी संस्था सोसायटीवर मविआचा विजय, 30 वर्षांच्या सत्तेला ब्रेक!
औरंगाबाद तालुक्यातील चितेपिंपळगाव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपच्या पॅनलचा पराभव केला.
औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातील भाजप नेते हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांना आज सहकारी संस्था सोसायटीवर (Corporative society)पराभवाचा सामना करावा लागलाय. औरंगाबाद तालुक्यातील (Aurangabad) चित्तेपिंपळगाव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीचा निकाल आज जाहीर झाला. यात भाजपचे माजी आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलवर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. विशेष म्हणजे बागडे यांचा स्वतःच्याच गावात पराभव झालाय. चित्तेपिंपळगाव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीवरील बाहडे यांच्या 30 ते 35 वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. या सोसायटीच्या निवडणुकीत 13 पैकी 12 उमेदवार निवडून आलेत. तर हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलकडे एकच सदस्य विजयी झाला.
महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
औरंगाबाद तालुक्यातील चितेपिंपळगाव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपच्या पॅनलचा पराभव केला. काँग्रेस नेते व माजी आमदार रामभाऊ अप्पा गावंडे यांचे पुत्र सामराव गावंडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजी गावंडे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झालाय. महाविकास आघाडीच्या शिवशक्ती शेतकीर पॅनलमधील 12 पैकी 11 उमेदवारांनी विजयी कामगिरी केली. तर भाजप नेते हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलवरील एका उमेदवाराचाच विजय झाला. त्यामुळे जिल्ह्यात बागडे यांच्यासाठी ही मोठी हार म्हटली जात आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदेसेना विजयी
दरम्यान, जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आमदारांना घवघवीत यश मिळालं. जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींपैकी 12 ठिकाणी शिंदे गटाच्या पॅनलचा विजय झाला. विशेष म्हणजे आर्थिक आणि औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वडगाव-कोल्हाटी-बजाजनगर ग्रामंपंचायतीवर आमदार शिरसाट यांचा प्रभाव कायम राहिला. आमदार शिरसाट यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने जनता त्यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात होतं. मात्र प्रत्यक्ष ग्राम पंचायत निवडणुकीत मात्र शिंदे गटाच्या पॅनलचा विजय झाल्याचं दिसून आलं.
औरंगाबादेत मंत्र्यांची संख्या वाढणार?
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या मंगळवारी होणार असल्याचे वृत्त आहे. भाजप तसेच शिंदे सेनेतील आमदारांपैकी कुणाच्या वाट्याला कोणतं मंत्रिपद येतंय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. औरंगाबादेत केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि जालन्याचे रावसाहेब दानवे यांच्या रुपाने दोन मंत्री आहेत. शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि संदिपान भूमरे यांनाही महाविकास आघाडीत मंत्रीपद होते. आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये संजय शिरसाट यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याची चर्चा आहे. शिरसाट यांच्यासोबतच मागील सरकारमध्ये मंत्री असलेल्यांनाही खातं मिळेल, अशी अपेक्षा आहे. असे झाल्यास औरंगाबादमधील मंत्र्यांची संख्या निश्चित वाढेल, अशी शक्यता आहे.