चंद्रकांत खैरे.. हातात पैसे..भोवती लोकांचा गराडा!! शिवसेनेच्या विराट सभेचा फॉर्मुला! नितेश राणे अन् अमेय खोपकरांचा खळबळजनक आरोप काय?
भाजप नेते नितेश राणे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक फोटो शेअर केला आहे. यात चंद्रकांत खैरेंचं नाव न घेता त्यांनी केवळ शिवसेनेच्या विराट सभेचा फॉर्मुला असं सूचक वक्तव्य केलं आहे.
मुंबईः अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधणाऱ्या औरंगाबादमधील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सभेत लाखोंची गर्दी उसळली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला जेवढी गर्दी झाली, त्यापेक्षाही जास्त लोक खेचून आणण्याची ताकद शिवसेनेत आहे, असे दावे शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून केले जात होते. पण अशा सभा आणि मोर्चांना पैसे देऊन लोक आणले जातात, असे आरोप विरोधकांकडून केला जातो. कालच्या उद्धव ठाकरे यांच्या विराट सभेतही पैसे देऊन लोक आणल्याचा आरोप केला जातोय. भाजप नेते नितेश राणे आणि मनसे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी हा खळबळजनक आरोप केलाय. विशेष म्हणजे यावेळी फक्त शाब्दिक आरोप न करता त्यांनी शिवसेनेचे माजी खासदार लोकांना पैसे वाटत असतानाचा फोटो शेअर केला आहे. शिवसेनेच्या विराट सभेचा फॉर्मुला असे कॅप्शन देत नितेश राणेंनी हा फोटो ट्विट केलाय तर मनसे नेते अमेय खोपकरांनीही थेट चंद्रकांत खैरेंचं (Chandrakant Khaire) नाव घेत हा फोटो शेअर केला आहे. राणे आणि खोपकरांनी टाकलेला हा फोटो कालच्या सभेच्या संदर्भानेच असेल तर शिवसेनेच्या सभेत जमलेल्या लाखोंच्या गर्दीमागील गणित उघडं पडण्याची शक्यता आहे.
नितेश राणेंचं ट्वीट काय?
भाजप नेते नितेश राणे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक फोटो शेअर केला आहे. यात चंद्रकांत खैरेंचं नाव न घेता त्यांनी केवळ शिवसेनेच्या विराट सभेचा फॉर्मुला असं सूचक वक्तव्य केलं आहे. या फोटोत चंद्रकांत खैरे लोकांना पैसे देत असताना दिसतात. नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या सभेच्या दुसऱ्या दिवशी हे ट्विट केलंयय
अमेय खोपकरांचं ट्विट काय?
तर मनसे नेते अमेय खोपकरांनीही हाच फोटो उद्धव ठाकरेंच्या सभेच्या दिवशी म्हणजे 08 जून रोजी रात्री ट्विट केलाय. त्यात त्यांनी थेट चंद्रकांत खैरेंचं नाव घेत आरोप केला. त्यांनी लिहिलंय ‘ चंदू खैरे सभे आधी पैसे वाटताना.. चंदू खैरेंचा ‘आक्रोश’- सभेसाठी या रे…’
राज ठाकरेंच्या सभेतील गर्दीवर खैरेंचा आरोप
अमेय खोपकर आणि नितेश राणे यांनी ट्विट केलेल्या या फोटोंना अनेक प्रतिक्रिया येत आहेत. मात्र हा फोटो उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या संदर्भानेच आहे की आधीचा कुठला आहे, याची पुष्टता झालेली नाही. पण हा फोटो खरा असला तर शिवसेनेच्या विरोधकांना हे आयतं कोलीत सापडलं, असंच म्हणावं लागेल. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेलाही लाखो लोकांची गर्दी होणार असा दावा करण्यात आला होता. झालंही तसंच होतं. औरंगाबादमधलं मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचं मैदान खचाखच भरलं होतं. मात्र या सभेला मनसे नेत्यांनी पैसे देऊन लोकं आणल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता. मला औरंगाबादमधील ग्रामीण भागातील लोकांचे तसे फोनही आले, असं वक्तव्य खैरे यांनी केलं होतं.
‘जलाक्रोश मोर्चात घागरी दिल्या…’
भाजपने औरंगाबादमध्ये काढलेल्या जल आक्रोश मोर्चातील महिला आणि पुरुषांना नव्या घागरी भाजपने दिल्या होत्या, असा आरोप एमआय़एमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला होता. लोक पाणी मिळण्यासाठी नाही तर कमीत कमी रिकाम्या घागरी मिळतील, या आशेने मोर्चात आल्याचा आरोप त्यांनी केला होता.