Aurangabad | औरंगाबाद काँग्रेसला धक्का, जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळकेंचा भाजपात प्रवेश
आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या 70 गटासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. या आरक्षण सोडतीत हक्काचे राखीव गट असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनाही धक्का बसला.
औरंगाबादः एकिकडे शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विरुद्ध उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचं कोर्टात घामासान युद्ध सुरुआहे तर दुसरीकडे औरंगाबादेत मोठी राजकीय घडामोड घडतेय. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदेला (Aurangabad ZP) मोठा हादरा बसला. औरंगाबादेत काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके या भाजपात प्रवेश करत आहेत. दुपारी एका पत्रकार परिषदेत शेळके या भाजपात प्रवेश करण्याची घोषणा केली. जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके आणि रामुकाका शेळके यांचा सत्कार करण्यात आला. भाजपचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या राजकारणात होणारी ही एक मोठी घटना मानली जात आहे. एकूणच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात महत्त्वाच्या राजकीय हालचाली सुरु आहेत. त्यामुळे आगामी काळात सत्तेची समीकरणं बदललेली दिसू शकतात.
हरिभाऊ बागडेंच्या उपस्थितीत प्रवेश
औरंगाबाद जिल्हा परिषदेत मागील वेळी काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे जि. प. अध्यक्षपददेखील काँग्रेसकडे होते. यंदा मात्र राज्यातील राजकीय घडामोडीनंतर जिल्ह्यातील चित्रही पालटताना दिसत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर फुलंब्री तालुक्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामराव शेळके आणि पत्नी मीना शेळके भाजपात प्रवेश करत आहेत. हरिभाऊ बागचेंच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. रामराव शेळके आणि मीना शेळके यांच्यासह अनेक काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला.
जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण जाहीर
आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या 70 गटासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. या आरक्षण सोडतीत हक्काचे राखीव गट असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनाही धक्का बसला. जिल्हा अध्यक्षा मीना शेळके यांचा गट ओबीसी महिलांसाठी राखीव राहिलेला नाही. तर उपाध्यक्ष एल जी गायकवाड यांचा गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे. तर शिक्षण समितीचे सभापती अविनाश गलांडे यांचाही गट महिलांसाठी राखीव असा जाहीर झाला आहे.
जि. प. आरक्षण कसे?
- – जिल्हा परिषदेत 70 गटांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.
- – 18 जागा ओबीसींसाठी त्यापैकी ९ जागा महिलांसाठी राखीव असतील.
- – अनुसूचित जातीमसाठी 9 जागा, त्यात 5 जागा महिलांसाठी राखीव
- – अनुसूचित जमातींसाठी 4 जागा आणि त्यात 2 जागा महिलांसाठी राखीव असतील.
- – खुल्या प्रवर्गासाठी 39 गट असून त्यापैकी 19 जागा महिलांसाठी राखीव असतील.