Aurangabad | मंत्रीपद मिळुनही भूमरेंच्या कार्यक्रमात गर्दी नाही? लोक म्हणतात आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात तुफ्फान…..
पैठणचे आमदार संदिपान भुमरे हे शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांना औरंगाबाद जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
औरंगाबादः औरंगाबाद शिवसेनेसमोर सध्या बंडखोर आमदारांच्या वर्चस्वाचं मोठं आव्हान आहे. निम्म्यापेक्षा जास्त शिवसेना आमदार शिंदे गटात गेल्यानं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला पक्षसंघटनासाठी पहिल्यापासूनच झटावं लागणार आहे. त्यातच शिंदे गटातील दोन आमदारांना मंत्रिपदं मिळाल्याने याच आमदारांची जास्त चर्चा आहे. एकतर नव्या शिंदे गटाचे (CM Eknath Shinde) आमदार, त्यात मंत्रिपद यामुळे आमदारांचं राजकीय वजनच वाढलंय. पण औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणमध्ये नुकताच एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पैठणचे आमदार, मंत्री संदिपान भुमरेंचीही (Sandipan Bhumare) उपस्थिती होती. आता नवं-नवं मंत्रिपद मिळालेल्या आमदारांच्या कार्यक्रमाला तुफ्फान गर्दी होणं अपेक्षित होतं. पण पैठणमधल्या या कार्यक्रमात तर शंभर दीडशेच्या वर लोकंही नव्हते. त्यामुळे शिंदेगटाच्या आमदाराची गर्दी अशी एकाएकी का ओसरली, अशी चर्चा आता जिल्ह्यात सुरु झालीय…
कोणता कार्यक्रम होता?
पैठणमध्ये संदिपान भुमरे यांना नुकत्याच झालेल्या कॅबिनेट विस्तारात रोहयो व फलोत्पादन मंत्रीपद मिळालंय. त्यानंतर पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शनिवारी मंत्र्यांच्या उपस्थितीत एका रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं. आपल्या मतदार संघातील आमदाराला मंत्रिपद मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण येणं अपेक्षित आहे. किमान हजारेक जणांची गर्दी तरी या कार्यक्रमाला अपेक्षित होती. मात्र पैठणमधलं चित्र काहीसं आश्चर्यकारक आणि शिंदे गटाला विचार करायला लावणारं ठरलं. या कार्यक्रमात मोजून शंभर ते दीडशे लोक उपस्थित होते.
आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमाला तुफ्फान…
शिंदे गटाने केलेलं बंड मोडून काढण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मागील महिन्यापासूनच निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे. औरंगाबादमध्येही आदित्य ठाकरेंनी दौरा केला होता. यावेळी ज्या ज्या ठिकाणाहून आमदार शिंदे गटात गेले, तेथेच आदित्य ठाकरेंनी शिवसेना मेळावा घेतला. त्यामुळे पैठणमध्येही आदित्य ठाकरेंची जोरदार सभा झाली होती. या सभेसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी जंगी तयारी केली होती. त्यामुळे सभेला जोरदार गर्दी जमली होती. पण भुमरेंच्या कार्यक्रमाला आटलेली गर्दी पाहून जमलेल्यांना आदित्य ठाकरेंच्या मेळाव्यातली गर्दी आठवली नाही तरच नवल….
पालकमंत्रिपदही मिळणार?
पैठणचे आमदार संदिपान भुमरे हे शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांना औरंगाबाद जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकतंच 15 ऑगस्ट रोजी त्यांना ध्वजारोहणाचाही मान मिळालाय. याआधी संजय शिरसाट हे औरंगाबादचे पालकमंत्री होणार अशी चर्चा होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान न मिळाल्याने पालकमंत्री पदी भुमरेंची वर्णी लागणार अशी चर्चा आहे.